खासगी वाहनांचे पेट्रोल आजपासून 30 एप्रिलपर्यंत बंद

खासगी वाहनांचे पेट्रोल आजपासून 30 एप्रिलपर्यंत बंद

संगमनेर, मुकूंदनगर, आलमगीर व जामखेडच्या हॉटस्पॉटला 23 पर्यंत मुदतवाढ

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, छावणी परिषद हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास सोबत, सर्व खाजगी दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी पेट्रोल विक्री पूर्णतः बंद करण्याचा 30 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत घेण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

दम्यान, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमनेर शहरातील नाईकवाडा पुरा, मुकूंदनगर (नगर शहर), आलमगीर (ता. नगर) आणि जामखेड या ठिकाणी 10 तारेखला हॉट स्पॉट जाहीर करण्यात आले होते. त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसह अन्य सर्व बाबींवर बंधने लावण्यात आली होती. या हॉटस्पॉटची मुदत काल 14 तारखेला संपणार होती. यामुळे जिल्हाधिकारी यांनी काल सायंकाळी याबाबत स्वतंत्र आदेश काढत हा हॉट स्पॉट 23 एप्रिलपर्यंत वाढविला आहे.

दुसरीकडे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आता जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरुस, जत्रा मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रिडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादींना मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारचे कृत्य जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणुक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व विदेशी सहली इत्यादींचे आयोजन करण्यास मनाई राहील.

कार्यक्षेत्रात असणारी दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, संग्रहालय बंद राहतील. मंदीर, मस्जिद, गुरुद्वार, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरिकांचे प्रवेशासाठी बंद राहतील व सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.

मात्र, हा आदेश शासकिय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम आस्थापना. बँक, एटीएम, विमा सेवा, अत्यावश्यक सेवा मधील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने, अ‍ॅम्बुलन्स, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान ( सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत), दूध विक्री (सकाळी 5 ते 8 वा. व सायंकाळी 5 ते रात्री 7 वाजेपर्यत), फळे व भाजी-पाला, औषधालय, एलपीजी गॅस वितरण सेवा यांना लागू राहणार नाही.

तसेच सर्व खाजगी दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी पेट्रोल विक्री पूर्णतः बंद करण्यात येत आहे. (शासकीय वाहने, अ‍ॅम्बुलन्स व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स व परिचारीका व वैद्यकीय सेवेशी निगडीत कर्मचारी यांना ओळखपत्र तपासून सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यत पेट्रोल विक्री करण्यात येईल) व डिझेल विक्री दररोज सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यत राहील, असे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

30 तारखेपर्यंत दारू विक्री बंद
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परमिट रुम, हॉटेल, बार हे 30 एप्रिलपर्यत बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना या विषाणूचा संसर्ग अधिक वाढ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे आदेश काढले आहेत.

दैनिकांचे कार्यालय सुरू
प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक) नियतकालिके, टी.व्ही. न्युज चेंनेल इत्यादींचे कार्यालये, दूरसंचार, पोस्ट व इंटरनेट सेवा पुरविणार्‍या आस्थापना, चिक्स, चिकन व अंडी दुकाने व वाहतूक सेवा, जनावरांचे खाद्य, खुराक, पेंड विक्री दुकाने व वाहतूक सेवा, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतुक सेवा, शेतमाल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री यांना आदेशातून वगळण्यात आले आहे.

मदतीचे फोटो प्रसारीत करण्यावर बंदी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात स्वयंसेवी संस्था राजकीय पक्ष, नेते, व्यक्ती हे त्यांच्या मार्फत फुड पॅकेटस, किराणा किटस, सॅनिटायझर मास्क या स्वरुपाची मदत वाटपबाबतचे फोटो काढून ते सोशल मिडीया, वर्तमानपत्र, दुरचित्रवाणी यावर प्रसारीत करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उदयोग व्यवसायातील प्रभावित झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैदयकीय देखभाल या सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून शिजविलेले, शिजविण्यासाठी तयार अन्नाचे पुरवठा करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, नेते,व्यक्ती हे त्यांचे मार्फत फुड पॅकेटस, किराणा किटस, सॅनिटायझर मास्क या स्वरुपाची मदत वाटप करीत आहेत. ही मदत वाटप करताना मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत आणि सोशल डिस्टन्स तत्वाचे पालन होताना दिसत नाही. तसेच मदत वाटपाबाबतचे फोटो घेऊन सदरचे फोटो हे सोशल मिडीया, वर्तमानपत्र, दुरचित्रवाणी यावर प्रसारीत करीत असल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com