प्राथमिक, माध्यमिकसाठीही पीडीएफ पुस्तकांचा पर्याय

jalgaon-digital
3 Min Read

सुट्टीतही ई- बालभारतीच्या संकेतस्थळावरून पुस्तके डाऊनलोड करणे शक्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा कोरोना संसर्गामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील पहिले ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्य पुस्तके उशीराने मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जर पाठ्य पुस्तकांचे उशीरा वितरण झाल्यास प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पीडीएफ पुस्तकांचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. बालभारतीच्या संकेतस्थळावर ही सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. सध्याच्या सुट्टीच्या काळात विद्यार्थी या पुस्तकांची पीडीएफ फाईल ई-बालभारती या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून अभ्यासाला सुरूवात करू शकतात.

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात जानेवारीपासून पुढील शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पहिली ते आठवीपर्यंत शाळांच्या पाठ्य पुस्तकांसाठी लगबग सुरू होते. यू डायसच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यातील इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या आणि इयत्तानिहाय विषयांची पुस्तकांच्या मागणीची प्रक्रिया सुरू करण्यात येते. यू डायसवर नोंदणी असणार्‍या विद्यार्थी संख्येनूसार बालभारतीकडे पुरस्तकांची मागणी करून ती शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत संबधीत इयत्तानिहाय विषय पुस्तके आणि विद्यार्थी संख्येनुसार पुस्तकांचे संच उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग प्रयत्न करत असतो.

यंदा देखील साधारण फेबु्रवारीपासून या प्रक्रियेला सुरूवात झाली. मात्र, मार्च महिन्यांच्या दुसर्‍या पंधारवाड्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देशासह राज्यभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन सध्या 30 एप्रिलपर्यंत असून त्याचा कालवधी आणखी वाढणार ? याबाबत आताच सांगता येणे शक्य नाही. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात वेळेवर पाठ्य पुस्तके उपलब्ध होतील, की नाही, याबाबत शंका आहे. यामुळे बाजारात नवीन पुस्तकांची छापई होवून ते विक्रीसाठी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बालभारतीच्या संकेतस्थळावरून संबंधीत पुस्तकांची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून त्याव्दारे अभ्यासाचा श्री गणेशा करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे.

दरम्यान लॉकडाऊन उठल्यानंतर तातडीने बालभारतीकडून अभ्यासक्रमानूसार पुण्यावरून पुस्तकांचे गाव पातळीवरील शाळेपर्यंत वाटप करण्यात येईल. मात्र, यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याने यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच पुस्तके उपलब्ध होतील याबाबत अनिश्चितता आहे.

100 टक्के जुने पुस्तके जमा करण्याचा संकल्प
संभाव्य पुस्तकांचा तुटवडा लक्षात घेवून मागील महिन्यांत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गतवर्षीच्या इयत्तेतील संबंधीत विद्यार्थ्यांकडून 100 टक्के पुस्तके जमा करण्याचे आदेश दिले आहे. जमा होणारी ही पुस्तके पुन्हा नव्याने दाखल होणार्‍या त्यात्या इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

शालेय विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचा विषय हा साधारणपणे जून महिन्यांत येतो. सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. पालक आणि मुले घरात असून त्यांना पुढील इयत्तेतील पुस्तकांच्या पीडीएफ फायईल बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याव्दारे सुट्टीच्या काळात विद्यार्थी पुढील इयत्तेच्या अभ्यासाचा श्री गणेशा घरूनच करू शकतात.
–  रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *