Thursday, April 25, 2024
Homeनगरझटपट करोना चाचणी; ‘प्रवरा’ वापरणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान

झटपट करोना चाचणी; ‘प्रवरा’ वापरणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान

लोणी (वार्ताहर) – करोनाच्या टेस्टसाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा मोठा खर्च लक्षात घेऊन केवळ एक्स रे आणि रक्त चाचणीच्या साह्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून काही सेकंदात रुग्णांची वर्गवारी करोनाबाधित, करोना संशयित व इतर हे शोधण्याची प्रणाली प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटन स्थित एआय फॉर वर्ल्ड या संस्थेशी परस्पर सहकार्य करार करून पुढे आणली आहे.

देशात करोना चाचणीसाठी लागणार्‍या टेस्ट किटची असणारी कमतरता. त्याला लागणारा वेळ, टेस्ट लॅबची क्षमता व करोना आणि करोना शिवाय इतर आजारांतील फरक ओळखण्यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस काही नविन तंत्रज्ञान वापर करता येईल का? यांचा शोध घेत असतानाच एआय फॉर वर्ल्ड संस्थेचे कार्यकारी संचालक व आपल्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. वैभव देशपांडे यांच्याबरोबर परस्पर सहकार्य करार करून देशात प्रथमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने प्राथमिक चाचणी करण्याचे तंत्रज्ञान पुढे आणले आहे, अशी माहिती प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून भारतात आरोग्य सेवेत हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात कसे वापरता येईल यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाबरोबर अधिक संशोधन करून करोनासह इतर आजारांवरील निदान चाचण्या पुढे आणू, असे यावेळी एआय फॉर वर्ल्ड संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.वैभव देशपांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवर बोलताना सांगितले. ही प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांच्या संघात नेदरलँडचे सचिन कुलकर्णी, कॅनडाचे अमित साहु, व युकेचे विधीज्ञ हिमांशु दासरे यांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज, डॉ. सुरेश जंगले, डॉ. रवींद्र कारले आदी उपस्थित होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आरोग्य क्षेत्रात निदानाची नविन शाखा विकसित होत आहे. इतर देशात हे तंत्रज्ञान वापरले जाते पण आता भारतात हा तंत्रज्ञानाचा वापर आम्ही सुरू करीत आहोत. करोनाच्या चाचणीत रुग्णांचा एक्स रे आणि रक्त तपासणीच्या रिपोर्ट अपलोड केल्यानंतर फक्त पाच सेकंदात संगणकाच्या साह्याने रुग्ण कोव्हिड बाधीत आहे किंवा नाही यांची शक्यता तपासता येते. या प्रणालीने 99.9 टक्के इतके अचूक निदान करणे शक्य आहे. या चाचणीच्या शासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. देशासाठी या परिस्थितीत हे तंत्रज्ञान मोठी उपलब्धी ठरू शकते अशी माहिती अभिमत विद्यापीठाचे संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. राहुल कुंकुलोळ यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या