Wednesday, April 24, 2024
Homeनगरपुरवठा खात्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस; ना. प्राजक्त तनपुरे संतापले

पुरवठा खात्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस; ना. प्राजक्त तनपुरे संतापले

राहुरीच्या तहसील कार्यालयात मंत्र्यांनी अधिकार्‍यांची घेतली ‘हजेरी’

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी यांना लागणारे दाखले कधीही वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय येथे अचानक भेट दिली. यावेळी तहसील कार्यालयातील 50 टक्के कर्मचारी गैरहजर होते.

- Advertisement -

पुरवठा खात्याच्या नायब तहसीलदार श्रीमती चौधरी यांच्याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारींचा पाढाच सुरू असल्याने अधिकार्‍यांना धारेवर धरून जनतेची कामे वेळेवर होणार नसतील तर कारवाई करण्याच्या सूचना ना. तनपुरे यांनी तहसीलदार फसयोद्दीन शेख यांना दिल्या. राहुरी पुरवठा खात्याचा गलथान कारभार पाहून अवाक् झालेल्या ना. तनपुरेंनी संबंधित अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

ना. तनपुरे यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या कामकाजाबाबत विशेषतः पुरवठा शाखेच्या कारभाराविषयी असणार्‍या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अचानक तहसील कार्यालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’ देऊन सेतूच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ना. तनपुरे यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात नागरिकांसमोर पुरवठा शाखेच्या नायब तहसीलदारांना बोलावले असता त्या 10.30 वाजेपर्यंत कार्यालयात आल्याच नसल्याचे समजले.

याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत नायब तहसीलदार श्रीमती चौधरी या येणार्‍या नागरिकांशी उर्मटपणाची भाषा वापरतात, दाखले, रेशनकार्ड तयार असूनही वेळेपूर्वी देण्यास टाळाटाळ करतात. मग त्यात रेशन कार्डचे नूतनीकरण असो, नवीन रेशनकार्ड काढण्याचे काम असो, की त्या अनुषंगिक इतर दाखल्यांसाठी नागरिकांचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यास जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत जर दाखला दिलाच पाहिजे, अशी सक्त ताकीद ना. तनपुरे यांनी अधिकार्‍यांना दिली.

पुरवठा खात्याचे संबंधित क्लार्क यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना ना. तनपुरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. संबंधित अधिकार्‍यांची मंत्र्यांसमोर पुरती भंबेरी उडाली. मंत्र्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी गोंधळून गेले. पुरवठा खात्याच्या नायब तहसीलदार तसेच त्या विभागाच्या लिपिक यांना या प्रश्नावरून चांगलेच खडसावले. दरम्यान, ना. तनपुरे यांनी राहुरी तहसील कार्यालयातील पुरवठा खात्याचा चांगलाच पंचनामा केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार ढमाळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

राहुरी तहसील कार्यालयात अजबच कायदे राबविले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या भूमिपुत्रांना शिक्षणासाठी लागणार्‍या उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी किचकट नियम व अटी लादण्यात येतात. एकरी 40 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेलाच तलाठ्यांचा उत्पन्नाचा दाखला सक्तीचा करताना शेतकर्‍यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दाखले वेळेत न मिळाल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागले असून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित महिला अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांची उचलबांगडी करण्याची मागणी नागरिक व शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या