Monday, April 29, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही – प्रफुल्ल पटेल

महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही – प्रफुल्ल पटेल

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणतेही तणावाची परिस्थिती नसून तीन पक्षांचे सरकार असल्याने छोट्यामोठ्या घटना घडतच असतात. सर्वच आमदारांना मंत्रिपद देऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या सरकारमध्ये कोणतीही नाराजी नसल्याची स्पष्टोक्ती माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी मध्यान्ह आरतीपूर्वी साई दरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्कार केला. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, नीलेश कोते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर, विद्यार्थी काँग्रेसचे प्रकाश गोंदकर, प्रसाद पाटील, साई कोतकर, किरण माळी, संजय कोतकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

दर्शनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तीन पक्षांचे सरकार चालविण्यासाठी तिन्ही पक्षात समन्वय आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष सरकार चालविण्यास काही अडचण येणार नाही. आमची विचारधारा वेगळी असली तरी कॉमन प्रोग्राम आखण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचे सर्व विषय दोन दिवसांत मार्गी लागणार असून सर्व मंत्री सोमवारपासून आपली जबाबदारी खर्‍या अर्थाने पार पडण्याचे कामास सुरुवात करतील, असे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारने काही कायदे आणून देशाची शांतता भंग केली असल्याचे ते म्हणाले. सीएए आणि एनआरसीच्या बाबतीत घाईने कायदा बनविला गेला असून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. हे पूर्णतः चुकीचे असल्याचे पटेल यांनी सांगत कायदे बनविताना सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे, असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या