Thursday, April 25, 2024
Homeनगरकरजगाव येथे शेततळ्यातील 22 हजार माशांचा विषबाधेने मृत्यू

करजगाव येथे शेततळ्यातील 22 हजार माशांचा विषबाधेने मृत्यू

मत्स्यपालक शेतकर्‍याचे पाच लाखांचे नुकसान; मासे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले

नेवासाफाटा (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील करजगाव येथे शेततळ्यात मत्स्यपालन करणार्‍या शेतकर्‍याच्या शेततळ्यातील माशांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून यात सुमारे 22 हजार माशांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, करजगाव येथील शेतकरी रावसाहेब गेणुजी देवखिळे यांचे गट नं. 129 मध्ये दोन एकराचे 60 फूट खोलीचे पाण्याने भरलेले शेततळे गेल्यावर्षी तयार केले होते. त्यामध्ये 50 फुटापर्यंत पूर्ण भरलेले पाणी होते.

- Advertisement -

सदर तळ्यास लाखो रुपये खर्च करून शेतीसाठी हक्काचे बारमाही ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन सुरू केले. शेतीला जोडधंदा म्हणून बँकेचे हप्ते वेळेत जातील या हेतूने सर्व बाजूंनी दहा फुटापर्यंत काटेरी जाळीचे कुंपण करून त्यामध्ये कटला, राहू, मरळ, फंगाशीया, सायप्रस या जातीच्या 80 ते 90 हजार माशांची पिले सोडली. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून नियोजनानुसार दररोज खाद्य दिले जात होते.

मत्स्यशेतीविषयी माहितगाराकडून वेळोवेळी त्यांच्यासाठी आवश्यक बाबींची पुर्तता सुद्धा केली जात होती. तसेच त्यापैकी बरेचशे मासे एक ते दोन किलोपर्यंत वजनाचे तयार झालेले होते. त्यासाठी खरेदीस व्यापारीसुद्धा बोलणी करण्यास येत होते. परंतु दोन दिवसांपूर्वी रावसाहेब देवखिळे सकाळी त्यांना खाद्य घेऊन गेले असता त्यामध्ये हजारोंच्या संख्येने मासे मरून पाण्यावर तरंगताना दिसले. तसेच अतिशय स्वच्छ झालेले पाणी काळपट पडलेले आढळले. त्यानुसार अज्ञात व्यक्तीने तळ्यात विषारी पदार्थाच्या बाटल्या फेकलेल्या असाव्यात असा अंदाज त्यांनी बांधला.

याबाबत त्यांनी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आपल्या कर्मचार्‍यांसह शेततळ्यावर दाखल झाले. त्यांनी सर्व बाजूंनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी त्यांचेसमवेत डॉ. अंकुश देवखिळे, बाळसाहेब भदगले, अ‍ॅड. विठ्ठलराव देवखिळे, पत्रकार बाळासाहेब देवखिळे, चंद्रकांत ढवळे, गणेश लोहकरे उपस्थित होते. यावेळी श्री. सोनवणे यांनी त्यातील काही मासे व पाण्याचे नमुने (सॅम्पल) ताब्यात घेतले व नाशिक येथे तपासणीसाठी पाठविले.

श्री. देवखिळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विविध जातीचे 20 ते 22 हजार मासे 100 ग्रॅम ते दोन किलोपर्यंत वजनाचे होते. या माशांच्या मृत्युमळे त्यांचे पाच ते सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीने विषारी पदार्थाचा प्रयोग केला असावा असा संशय व्यक्त केला आहे. दोन दिवसांत नाशिकहून अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीचा तपास करण्यासाठी आग्रह करणार आहे असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या