शरद पवारांची पुण्यात पक्षातील नेत्यांसमवेत खलबते!
Share

शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत विस्ताराने चर्चा
मुंबई | प्रतिनिधी:
शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाशिवआघाडीच्या संभाव्य सरकारला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सायंकाळी पक्षातील प्रमुख नेत्यांशी विस्ताराने चर्चा केली. शरद पवारांच्या पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी सुमारे दोन तास बैठक चालली. या बैठकीला शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीबाबत माहिती देताना नवाब मलिक म्हणाले की, आजच्या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय स्थितीबाबत चर्चा झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट चालू आहे, त्यामुळे पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस नेतृत्त्वाबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सोमवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होत आहे. तर मंगळवारी दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची चर्चा होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
शरद पवार रविवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बैठक बोलावली. या बैठकीत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत पक्षातील नेत्यांची मते जाणून घेतली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत जनमाणसांत काय प्रतिक्रिया उमटत आहेत याचाही अंदाज पवारांनी घेतला.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे बहुतेक नेत्यांनी मत मांडल्याचे सांगण्यात आले. तसेच शरद पवारांनी महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल यासाठी पुढाकार घ्यावा अशी भावनाही या बैठकीत नेत्यांनी व्यक्त केली.
दगडापेक्षा वीट मऊ : जयंत पाटील
दगडापेक्षा वीट मऊ, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. भाजपपेक्षा शिवसेना बरी असे अप्रत्यक्ष सुचित करून पाटील यांनी महाशिवआघाडीचे पुन्हा एकदा स्पष्ट संकेत दिले. भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांची नावे उघड करून त्या आमदारांना अडचणीत आणू इच्छित नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदारही आमच्या संपर्कात आहेत, योग्य वेळी त्यांचा खुलासा करू असेही ते म्हणाले. आम्ही मेगाभरती करणार नाही तर मेरिट भरती करू. स्थानिक नेतृत्त्वाला विचारात घेतल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही. अडचणीच्या काळात पक्षाला साथ देणाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षात घेण्याबाबत विचार करू असे जयंत पाटील यांनी सांगितले.