Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभुजबळ-गीते भेटीने राजकीय चर्चेला फोडणी; चरणस्पर्शातून वेगवेगळ्या अर्थांचे धुमारे

भुजबळ-गीते भेटीने राजकीय चर्चेला फोडणी; चरणस्पर्शातून वेगवेगळ्या अर्थांचे धुमारे

नाशिक । प्रतिनिधी

माजी आमदार वसंत गीते यांनी आपले राजकीय गुरू छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक केलेला चरणस्पर्श सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे भिन्न विचारांचे पक्ष महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन राज्यात सत्तारूढ झाले आहेत.

- Advertisement -

फडणवीस-पवारांनी भल्या सकाळी शपथविधी उरकल्यापर्यंतच्या राजकीय घटना पाहिल्यावर राजकारणात आता अशक्य काहीही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच गीते यांनी आपल्या राजकीय गुरूला केलेल्या चरणस्पर्शाचे नाना अर्थ काढले जाऊ लागले आहेत. काही जण त्या घटनेचा ‘अन्वयार्थ’ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत तर काहींची ‘सूत्रे’ या चरणस्पर्शामागील कारणांचा शोध घेत आहेत.

भुजबळ-गीते हे शिवसेनेत एकत्र होते. दोघेही नाशिकचे आहेत. त्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण होणे व भुजबळ हे गीते यांचे राजकीय गुरू होणे यात गैर नाही. मात्र मधली काही वर्षे या दोघांत दुरावा निर्माण झाला होता. तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न भुजबळ यांचे चाणक्य डॉ. कैलास कमोद, दिलीप खैरे यांनी केला. त्यात त्यांना यश आले. त्यातच भुजबळ कारागृहात होते तर गीते सत्ताधारी पक्षात असूनही उपेक्षित होते. हाही धागा या गुरू-शिष्यांना एकत्र आणणारा ठरला आहे. भाजपत गीते तसे उपेक्षितच होते. पालिकेत गीतेंचा उपयोग सत्ता आणण्यासाठी पक्षाने करून घेतला. त्या बदल्यात त्यांच्या मुलाला उपमहापौरपद दिले. इतकाच काय तो गीतेंचा फायदा! पक्षात त्यांना स्वपक्षाच्या आमदाराशी संघर्ष करावा लागला. त्यांना कुणीही मदत केली नाही.

विधानसभेची उमेदवारी कबूल करूनही दिली गेली नाही. उलट ज्या आमदारांशी संघर्ष केला त्यांचाच प्रचार करण्याची वेळ गीतेंवर आली. भाजपत गीते कधी फार रमलेच नाहीत. सत्ताधारी पक्षात आहोत एवढेच गीतेंना काय ते समाधान होते. 2014 पासून खरे तर गीते यांचे निर्णय चुकतच गेले. त्यावेळी त्यांना भाजपची उमेदवारी मिळत असताना ते मनसेनेत राहिले. निवडणूक लढून पराभूत झाले. 2019 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देत असतांना व अजित पवार स्वतः फोन करीत असताना गीते यांनी कच खाल्ली.

निवडणुकीनंतर आपण केलेली चूक गीते यांना उमजली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली. इनकमिंगची सवय झालेल्या भाजपत सत्ताबदल होताच आता आऊटगोइंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने खडसे यांनी रणशिंग फुंकले आहे. ओबीसी मुद्दा खडसे यांनी उचलून धरला आहे. गीतेही ओबीसी समाजाचे आहेत. पक्षावर नाराज आहेत. आता त्यांचे राजकीय गुरू पुन्हा मंत्री झाले आहेत. त्यामुळेच चरणस्पर्शातून गीते काही वेगळा राजकीय विचार करण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महापौर निवडणुकीत भाजपला धडा शिकवता आला नाही. म्हणून त्याचे उट्टे स्थायी समितीच्या माध्यमातून तर भुजबळ यांना काढावयाचे नाही ना? असे असल्यास त्यासाठी आणि आगामी मनपा निवडणुकीसाठी भुजबळ यांच्यासाठी गीते हे ‘हुकुमाचा एक्का’ आहेत. तसे असल्यास या शिष्याचे राजकीय पुनर्वसन करण्याची आणि शहरात पक्ष वाढवण्याची संधी भुजबळ सोडतील ही शक्यता कमी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या