Type to search

Featured नाशिक राजकीय

वारी विधासभेची जगदीश गोडसे: कामगारांचा एल्गार; विधानसभेतही हवा कामगार नेता

Share

गणेश सावंत

दोन्ही प्रेस कामगारांच्या लढ्याचे रणशिंग गेल्या अडीच दशकांपासून फुंकले आहे. कामगारांच्या अनेक मागण्या, समस्यांचे निराकरण करण्यात यश आले. नाशिक जिल्ह्यातील कामगारांचे व कष्टकर्‍यांच्या प्रश्नांना योग्य ठिकाणी वाचा फोडण्यासाठीच नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसेे यांनी विधानसभेत जावे, अशी इच्छा कामगारांनी व्यक्त केली आहे.
काही व्यक्तींमध्ये जन्मजातच ऊर्जास्त्रोत असतो. समर्पणाची भावना असते. काहीतरी वेगळे करून दाखविण्याची इच्छाशक्ती असते. काम करत असलेल्या ठिकाणी सहकार्‍यांच्या हक्कासाठी लढा देणे, समाजासाठी काही देणे लागतो, या भावनेतून समाजाप्रती समर्पित होणे, यासाठी अशा व्यक्ती स्वत:ला झोकून देतात. अशाच झोकून देणार्‍या व्यक्तींमध्ये जगदीश गोडसे यांचा समावेश होतो. गोडसे यांनी भारतीय जनता पक्षाकडून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.

करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरी करताना गोडसे यांचे दोन्ही प्रेसमधील कामगारांशी जवळकीचे नाते निर्माण झाले. ज्यातून त्यांच्या प्रश्नांचा उलगडा होऊ लागला. या दोन्ही प्रेस केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने प्रश्नांची सोडवणूक करणे अवघड होत होते. अगदी साधी कामेही दिल्ली स्तरावरूनच होत असते. अशा प्रलंबित प्रश्नांची माहिती गोडसे यांनी घेतली आणि ते सोडवणुकीच्या दृष्टीने प्रारंभी काही सहकार्‍यांच्या मदतीने आणि नंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले.

या प्रयत्नांना हळूहळू यश येत गेले. कामगारांचे प्रश्न मार्गी लागत असल्याने त्यांनीही सातत्याने गोडसेंवर विश्वास व्यक्त केला. आणि या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. म्हणूनच 20 वर्षांपूर्वी गोडसे यांना कामगार सहकार्‍यांनी वेल्फेअर फंड कमिटीवर निवडून दिले व जनरल सेक्रेटरी केले. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक वाढली आणि त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबविले. आजही कामगारांना प्रतिष्ठा मिळावी आणि ना. रोडमध्ये सामाजिक उपक्रम राबवताना त्याचा उपयोग नाशिकरोडकरांबरोबरच कामगारांनाही व्हावा, हाच ध्यास गोडसे यांनी घेतला असून तोच त्यांचा श्वास झाला आहे. कामगार बांधवांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी विधिमंडळासारखे दुसरे योग्य सभागृह नाही. म्हणूनच सहकार्‍यांनी त्यांना निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे.

कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणार्‍या हिंद मजदूर सभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी गोडसे यांची निवड झाली. तसेच हिंद मजदूर सभेच्या राज्याच्या शाखेतही ते विशेष निमंत्रित सदस्य आहेत. इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या जनरल सेक्रेटरीपदी कामगार बांधवांनी विश्वासाने त्यांची निवड केली आहे. प्रेस कामगारांना पूर्वी कर्ज घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. कामगारांना सन्मानाने कर्ज मिळावे, या भावनेतून प्रेस कामगारांची अर्थवाहिनी झालेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसा. लि. ची स्थापना झाली. त्याचे ते सध्या विद्यमान चेअरमन आहेत. याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त युनीग्लोबल कामगार संघटनेच्या एशिया पॅसिफिक विभागाच्या वर्किंग कमिटीचे सदस्यत्वही त्यांना प्राप्त झालेले आहे. भारतातून ते एकमेव सदस्य आहेत.

अशा विविध पदांवर काम करताना कामगारांना केंद्रबिंदू ठेवून त्यांचे अधिकाधिक हित त्यांनी जोपासले. वेल्फेअर फंड कमेटीच्या कार्यकाळात कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, शहरातील रक्तपेढ्यांना मदत, कामगार त्यांचे कुटुंबिय व खास करून त्यांच्या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, प्रसिद्ध लेखकांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच त्यांना अभ्यास करताना एकांत मिळावा, यासाठी अद्ययावत लायब्ररी व अभ्यासिका त्यांनी सुरू केली. गणेशोत्सवाला केवळ धांगडधिंग्याचे स्वरुप न येऊ देता, त्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गोडसे यांनी केले.

प्रेस व्यवस्थापनाकडून पूर्वी वेल्फेअर फंड कमेटीला अल्प प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळत असे, त्या आर्थिक सहाय्यात वाढ, सेवकांच्या पाल्यांना प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन मिळावे, या हेतूने त्यांचा गुणगौरव समारंभ, तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने, विद्यार्थ्यांना डिक्शनरीचे वाटप, वर्क्स कमिटीच्या माध्यमातून कामगारांना पूर्वी मिळणार्‍या सेफ्टी शूजपेक्षा उत्तम दर्जाचे ब्रँडेड सेफ्टी शूज, सेफ्टी गणवेशाचा दर्जा, कामगारांची वेळेत न होणारी पदोन्नती योग्य वेळी होईल, यासाठी प्रयत्न त्यांनी केले.

या पदोन्नतीमध्ये त्यांनी कुणाही कामगारावर अन्याय होऊ दिला नाही. स्वत:च्या कारखान्याच्या सुरक्षिततेसाठी कामगारांनी कशी काळजी घ्यावी, यासाठी मार्गदर्शन शिबिरे, सुरक्षेचे उपाय कामगारांनीच लेखाद्वारे पोस्टरद्वारे सुचवावे, यासाठी स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले. त्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून बक्षिसे वाटपही केली. नेत्रचिकित्सा, व्यसनमुक्ती यासाठी व्याख्यानांचे आयोजन गोडसे यांनी केले.

2012 साली कामगारांनी गोडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने आय. एस. पी. व सी. एन. पी. युनियन या आय. एस. पी. मजदूर संघाच्या कार्याध्यक्षपदी विराजमान केले. या युनियनला व्यवस्थापनाबरोबर धोरण ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गोडसे यांचे कामही वाढले. दोन्ही प्रेसमधील सुमारे चार ते पाच हजार कामगार, त्यांचे कुटुंबिय यासाठी काहीतरी वेगळे करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि म्हणूनच दोन्हीही प्रेसमध्ये अनुकंपा तत्वावर वारसाला नोकरी देण्याची सवलत जी अनेक वर्षे बंद होती ती सुरू व्हावी, यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले. व्यवस्थापनाबरोबर बैठका, पत्र व्यवहार करून रकमेऐवजी नोकरी मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

त्यात अखेर यश आले. 2013 पासून अनुकंपा पॉलिसी सुरू झाली. त्यामुळे वारसांच्या चेहर्‍यावर हसू फुलले ते गोडसे यांच्यासाठी अनमोल होते. त्याचबरोबर पाचव्या वेतन आयोगाचा पे स्केलचा प्रश्न निकाली काढला. प्रत्येक कामगाराला एक ग्रेड अपग्रेड केले, त्यामुळे कामगारांना लाभ झाला. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ होऊन तो 10 हजार रु. पर्यंत वाढवून दिला. रात्रपाळी भत्त्यातही वाढ करवून घेतली.
सेवानिवृत्त कामगारांसाठी गोडसे यांनी मोठे योगदान दिले आहे. पूर्वी कामगारांना सेवानिवृत्तीनंतर मेडिकल अलाऊन्स म्हणून 500 ते 1000 रुपये मिळायचे. वयाच्या साठीनंतर अनेक प्रकारचे आजार होतात.

त्यांच्या स्वत:साठी व कुटुंबासाठी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी ही रक्कम कमी पडत होती. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांना उपचार घेताना अडचणी निर्माण होत असत. व्यवस्थापनाकडे मागणी लावून धरली आणि सेवानिवृत्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस मेडिकल सेवा गोडसे यांनी उपलब्ध करून दिली. 2008 सालापासून ही सुविधा सेवानिवृत्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मिळत आहे. त्यांनी कामगारांसाठी जे काम केले त्यातील हे सर्वात मोठे काम आहे. तसेच रजा विकण्याचा अधिकार, जागा रिक्त नसतानाही आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कामगारांना टाईम बाऊंड प्रमोशन पॉलिसी दिली. सातवा वेतन, दोन्ही कारखानांमध्ये अत्याधुनिकरणासाठी 1500 ते 2000 हजार कोटी निधी आणला. कामगार भरतीला मान्यता मिळवून घेतली. असे एक ना अनेक प्रश्न मार्गी लावले.

केदारनाथ येथे महाप्रलय आला, तेथील रहिवासी व सरकारी मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. सामाजिक बांधिलकी म्हणून कामगारांचा एक दिवसाचा पगार प्रलयग्रस्तांना दिला. केरळला पूरग्रस्त निधी दिला. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 47 लाख रुपयांची मदत केली. त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या अनाथ मुलांच्या आश्रमशाळेत 15 लाख रु. खर्चून पाण्याची सिमेंटची टाकी दिली. सिन्नर तालुक्यात सुसज्ज अभ्यासिका निर्मितीसाठी 60 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले. रोडच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेला सुसज्ज बस उपलब्ध करून दिली. घोटी ग्रामपंचायतीला वाचनालय व सुसज्ज अभ्यासिकेसाठी 50 लाख रुपयांची मदत दिली. सोलापूर व सांगली येथील पूरग्रस्थांसाठी 35 लाख 60 हजार रुपयांची मदत दिली. असे मोठे योगदान गोडसे यांनी समाजासाठी दिले आहे.

राजकारणात प्रवेशासाठी गोडसे यांनी भाजपचाच पर्याय निवडला, यालाही कारण आहे. गोडसे हे कामगार नेता असले तरी त्यांच्या कामगार बांधवांसाठी ते एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच वावरतात. कुणीतरी पुढाकार घेऊन लढणे गरजेचे असते. म्हणून गोडसे कामगारांचा लढा लढत आहेत. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांमधून नेते घडले आहेत. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना भाजपने नेतृत्व गुणाच्या आधारे मोठे केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना, अभ्यासू आणि आपल्या क्षेत्रावर हुकूमत असलेल्या व्यक्तींना आमदार, खासदार, मंत्री करते. उदा. शिक्षक आमदार, अर्थनिती तज्ञ, विदेश निती तज्ञ, कृषी तज्ञ यांना संधी मिळाली; पण कामगार क्षेत्र कायम यापासून वंचित राहिले. कामगार क्षेत्राला अशी संधी फार कमी वेळा मिळते. किंबहुना, हे क्षेत्र राजकीय पदापासून वंचितच राहिले आहे, अशी भावना कामगारवर्गात निर्माण झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनांनी आपला हक्काचा माणूस विधिमंडळात जावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा मान राखत देश व राज्यातील नेतृत्व योग्य निर्णय घेईल आणि कामगारवर्गाचा सन्मान करेल. त्यामुळेच गोडसे यांच्यासारखा कामगार, कार्यकर्ता भाजपकडे आकर्षित झाल्यास नवल नाही. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप जगदीश गोडसे यांना निश्चित उमेदवारी देईल, असा विश्वास कामगारांना आहे.

गोडसे यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे अनेक प्रश्न सुटले. ते आमदार झाले तर मतदारसंघातील जनतेसाठीही अहोरात्र मेहनत घेतील, मतदारसंघात प्रेस कामगारांबरोबरच एच. ए. एल., एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प, रेल्वे, मेरी, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्य सरकारी कर्मचारी असे विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी, कामगार रहातात. शिवाय सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कामगारही ना. रोडजवळ असल्याने येथे स्थायिक होऊ लागले आहेत. अशा सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळ हे एक हक्काचे व्यासपीठ आहे.

गोडसे हे सातत्याने कामगार वर्गासाठी लढा देत आहेत. पण विधिमंडळात गेल्यावर जे अधिकार प्राप्त होतात, त्या आधारे कामगारांचा लढा अधिक सक्षमपणे ते लढू शकतील आणि कामगारांचे प्रलंबित प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावू शकतील. यासाठी कामगार, कर्मचारी यांच्याबरोबरच नागरिकांचाही आपला हक्काचा माणूस म्हणून गोडसे हे उमेदवारी करणार आहेत. विजयी झाल्यावरही ते कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा कायम ठेवतील, असा विश्वास त्यांच्या सहकार्‍यांना आहे. वरील अन्य संकल्पांप्रमाणे हा ही त्यांचा एक संकल्पच आहे आणि म्हणूनच त्यांच्या मतदारांनीही त्यांच्यावर संकल्पपूर्तीसाठी विश्वास टाकावा, अशी त्यांच्या सहकार्‍यांची अपेक्षा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!