Friday, April 26, 2024
Homeनगरयावर्षी राजकीय मंडळींचे जामखेडमधून पाणीटँकर गायब

यावर्षी राजकीय मंडळींचे जामखेडमधून पाणीटँकर गायब

शहराला मिळतंय बारा दिवसाआड पाणी; पुढील चार महिने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – शहराला पाणीपुरवठा हा बारा दिवसाआड होत असला तरी उद्याप एकही शासकीय अथवा, खाजगी टँकर सुरू झाला नाही. मागील वर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय मंडळींनी सुरू केलेले टँकर या वर्षी मात्र गायब झाले आसल्याचे दिसून येत आहे. त्यातच पुढील चार महीने पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होणार आसल्याने तातडीने टँकरने पाणी मिळावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.

- Advertisement -

मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच भुतवडा तलाव कोरडा पडला होता. त्यावेळी शहरासाठी 38 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. नळाद्वारे देखील 20 दिवसांनी नागरिकांना पाणी मिळत होते. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते.

जामखेड नगरपरिषदेकडून शहरासाठी 21 टँकर तर खाजगी व सामाजिक कार्यकर्त्यांन कडुन 25 ते 30 पाण्याचे टँकर सुरू झाले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात या टँकरचा अधार मिळाला होता. त्यातच लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर पाणी टंचाईचा फायदा घेत अनेक राजकीय मंडळीनी शहरासह तालुक्यात स्व खर्चातून पाण्याचे टँकर सुरू केले होते. परीणामी मागिल वर्षी टंचाईची दाहकता नागरिकांना जाणवली नाही.

या वर्षी मात्र पुन्हा दुष्काळाने डोके वर काढले आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आसल्याचे दिसून येत आहे. पूर्वी नळाला सहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा होत होता. सध्या मात्र बारा ते पंधरा दिवसाआड होताना दिसत आहे. परिणामी नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शासना कडुन देखील अद्याप शहरात एकही पाण्याचा टँकर सुरू झाला नाही.

त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी राजकीय मंडळींची व सामाजिक कार्यकर्त्यांचे मोफत पाण्याचे टँकर सुरू होतील अशी आशा होती मात्र एक महीना होऊनही अद्याप एकाही राजकीय मंडळींनी टँकर सुरू केले नसल्याचे नागरीकांन मधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी निवडणूका जवळ आल्या होत्या त्यामुळे अनेक राजकीय मंडळींनी मागणी न करताच टँकर सुरू केले होते. मात्र सध्या शहराला टँकरची गरज असूनही अद्याप टँकर सुरू न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या भुतवडा तलावाची साठवणूक क्षमता 119 दक्षलक्ष घनफूट व जोडतलावाची 48 दशलक्ष घनफूट आहे. सुरुवातीला पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने तलावात पाणीसाठा होऊ शकला नाही. नंतर परतीच्या मान्सूनमुळे 50 दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला होता. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे तलावात 31.15 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 11.26 दशलक्ष घनफूट आहे. तर मृत पाणीसाठा 20 दशलक्ष घनफूट आहे.

नगरपालिकेने टँकर सुरू करावेत
मागील वर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्षांच्या राजकीय नेतेमंडळीनी शहरात व तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू केले होते. मात्र यावर्षी देखील शहरात बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तरीदेखील एकाही राजकीय नेत्यांनी अथवा शासनाने टँकर सुरू केला नाही. तसेच परिसरातील बोअर अटले असल्याने सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तरी लवकरात लवकर नगरपालिकेने टँकर सुरू करावेत त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न दूर होईल.
-विकी सदाफुले, नागरिक

- Advertisment -

ताज्या बातम्या