Thursday, April 25, 2024
Homeनगरपन्नाशी ओलांडलेल्या पोलिसांना देणार ‘सेफ’ ड्युटी

पन्नाशी ओलांडलेल्या पोलिसांना देणार ‘सेफ’ ड्युटी

जिल्हा पोलीस दलाचा निर्णय : अधिकारी, कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी मोहीम

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना विरोधात लढा देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांपैकी काहींना करोनाची लागण झाली आहे. राज्यात तीन पोलीस कर्मचार्‍यांचा यामुळे मृत्यू झाला. यामुळे जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणी मधून ब्लड प्रेशर, शुगर असल्याचे निदान झालेल्या पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी ड्यूटी देण्यात येणार नाही. 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेले व आजारी पोलीस कर्मचार्‍यांना करोना रुग्ण व संशयित रुग्णांचा संपर्क असलेल्या ठिकाणी ड्युटीवर न पाठविण्याचा निर्णय जिल्हा पोलिसांनी घेतला आहे.

- Advertisement -

राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही करोनाची बाधा झाली आहे. करोना संशयित, करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यासारख्या अत्यावश्यक सेवेतील करणार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त पोलीस करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधित पोलिसांपैकी काही कर्मचारी करोनामुक्त होऊऩ त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

तर तीन पोलिसांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ‘करोना वॉरियर्स’ म्हणून दिवसरात्र खडा पहारा देणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा संपर्क करोना रुग्णांशी येत असल्याने पोलिसांनाही त्याची लागण होत आहे. करोना रुग्ण असलेल्या ठिकाणी ड्यूटी करणे, रस्त्यावर उभे राहून येणार्‍या-जाणार्‍यांची तपासणी करणे, करोना संशयित, क्वारंटाईन असलेल्या ठिकाणी ड्यूटी करणे, चेक पोस्टवर नियुक्ती, करोना हॉटस्पॉट केंद्राच्या ठिकाणी ड्युटी करणे यामुळे पोलिसांचा करोना रुग्णांशी व संशयितांशी संपर्क येत आहे. यामुळे त्यांचे घरचे देखील चिंतेत आहे.

जिल्हा पोलीस दलाकडून करोनापासून संरक्षणासाठी शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. करोनाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्यात 150 अधिकारी, दोन हजार 500 कर्मचारी, राज्य राखीव दल, होमगार्ड असा तीन हजार कर्मचार्‍यांचा बंदोबस्त आहे. करोना प्रादुर्भाव सर्वत्र असल्याने बाहेरील बंदोबस्त बोलविता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांना जादा तास ड्यूटी करावी लागत आहे. पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद या रेड झोन असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा नगर जिल्ह्याला लागून असल्याने चेक पोस्टवर पोलिसांना विषेश काळजी घ्यावी लागत आहे.

मुंबईमध्ये पोलिसांना करोनाची लागण झाली व तीन जणांचा मृत्यू झाली. याची दखल आता जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. रक्तदाब, मधुमेह आजाराने त्रस्त असलेले आणि 55 वर्षापेक्षा पुढील कर्मचार्‍यांना सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. सुदैवाने जिल्ह्यात अद्याप एकाही पोलिसांला करोनाची लागण झाली नाही. मात्र खबरदारी म्हणून सर्व पोलिसांची तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात तपासणी केली जात आहे. आजारी असलेल्या, तसेच 50 पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना जनतेशी संपर्क होईल अशा ठिकाणी ड्यूटी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पोलिसांना सुट्टी नसली मिळाली तरी करोना रुग्णांचा संपर्क होईल अशा ठिकाणी ड्यूटी करण्यापासून मुभा मिळाल्याने पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सहाशेपेक्षा जास्त पन्नाशी ओलांडलेले
पोलिसांना करोनाची लागण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस दलाकडून काळजी घेतली जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी जेथे पोलिसांच्या आजारांचे लवकर निदान होईल अशा खासगी रुग्णालयात आरोग्य तपासणी केली जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन तपासणी करून घेत आहेत. नगर शहरातील दोन खासगी रुग्णालयात शहर पोलिसांची आरोग्य तपासणी केली जात आहे. 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेले जिल्ह्यात सुमारे 600 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आजारी कर्मचार्‍यांची आकडेवारी समोर येणार आहे. आजारी कर्मचार्‍यांना पोलीस ठाण्यात किंवा लोकांचा जास्त संपर्क येणार नाही, अशा ठिकाणी ड्यूटी देण्यात येणार आहे. आजारी पोलिसांच्या सुट्टी बाबात अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या