पोेलिसांकडून सहकार्य; अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

संगमनेरच्या कारागृहात कैद्यांची शाही व्यवस्था

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – संगमनेरच्या कारागृहात काही पोलिसांकडूनच कैद्यांचा चांगला पाहुणचार ठेवला जात असल्याची धक्कादायक माहिती समजली आहे. कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना तंबाखू, गुटखा अगदी सहज पोहोचवली जात असून काहींना घरचा डबाही मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

संगमनेर पोलीस ठाण्याच्या शेजारीच कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहात एकूण 4 बराकी आहे. एका बराकीत 6 असे 4 बराकीमध्ये 24 कैदी ठेवण्याची क्षमता या कारागृहाची आहे. मात्र क्षमतेपेक्षा नेहमीच जास्त कैदी या कारागृहात पहावयास मिळतात. सध्या 38 कैदी या कारागृहात विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. या कारागृहात कच्चे कैदी ठेवण्यात येतात. कैद्यांच्या बंदोबस्तासाठी कायम पोलीस तैनात करण्यात आलेले असतात. या पोलिसांवर पोलीस अधिकार्‍यांची नजर असते. कारागृह अधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील एक अधिकारी काम पाहत आहे.

या कारागृहात विविध गुन्हे केलेले आरोपी शिक्षा भोगत असतात. त्यामुळे त्यांना कैद्यासारखीच वर्तणूक मिळणे अपेक्षित असते. संगमनेरच्या कारागृहात मात्र वेगळे चित्र पहावयास मिळते. या कैद्यांना घरच्यासारखी वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. बहुतेक आरोपींना कुठलेना कुठले व्यसन आहे. अशा आरोपींना कारागृहात सहजरीत्या गुटखा, तंबाखूची सुविधा मिळते. काही कैद्यांना तर थेट घरचे जेवण पोहोच होते. या वस्तू कारागृहात नेमक्या जातात तरी कशा असा सवाल विचारला जात आहे.

कारागृहात बंदोबस्तास असलेल्या काही पोलिसांच्या मर्जीमुळेच कैद्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळत आहे. कैद्यांकडून यासाठी पैसे घेतले जात असल्याची खाजगीत चर्चा होत आहे. या कारागृहजवळ आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने संबंधितांनी नविन युक्ती शोधली आहे. कारागृहाच्या भिंती मागे जाऊन वस्तू व पैशांची देवाण घेवाण सुरु असल्याचेही बोलले जात आहे.

शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कारागृहाला दररोज भेट देतात. त्यांच्या निदर्शनास मात्र काही येत नसल्याचे दिसते. कैद्यांना भेटण्यासाठी ठराविक वार असतो. या कारागृहात मात्र कैद्यांंना केव्हाही सहज भेट होऊ शकते. अधिकार्‍यांनी याबाबत नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात वेगळे प्रकार घडू शकतात अशी भीतीही काही जण व्यक्त करतात.