पोलिसांसोबत नगरकर चढले गडावर

jalgaon-digital
3 Min Read

‘रेझिंग डे’… ‘ट्रेक विथ पोलीस’

अहमदनगर (प्रतिनिधी) – पोलीस दल स्थापनादिनाचे (रेझिंग डे) औचित्य साधून पोलिसांनी नगरकरांच्या हातात हात घालत मांजरसुंबा गड सर केला. ट्रेक कॅम्प अननोन संस्थेच्या सहकार्याने पोलिसांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाने नगरकरांमध्ये खाकीविषयी आस्था निर्माण झाली. पोलीस-नागरिकांमधील दरी दूर करण्याचा प्रयत्न सफल झाल्याचे समाधान प्रभारी एसपी डॉ. सागर पाटील यांनी व्यक्त केले. भल्या सकाळीच धुक्याची चादर लपेटलेल्या रस्त्याने पोलीस आणि ट्रेकर नगरकर पायथ्याशी पोहोचले. तेथे वार्मअप अन् गडावर वाफाळलेली कॉफी अन् चटकदार भेळीने उपक्रमाची सांगता झाली.

नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस कायम तत्पर असतात. त्यांना आपले मित्र माना. आपल्या तक्रारी पोलिसांपर्यंत घेऊन येण्यात कोणतीही भीती बाळगू नका. पोलिसांबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत, ते दूर करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी केले. नागरिकांशी सुसंवाद वाढावा यासाठी पोलीस दल स्थापनादिन सप्ताहांतर्गत विशाल लाहोटी यांच्या ट्रेक कॅम्प संस्थेच्या सहकार्याने नागरिकांसाठी मांजरसुंबा गड येथे आयोजित ‘ट्रेक विथ पोलीस‘ उपक्रमात ते बोलत होते.

पोलिस आणि नागरिक यांच्यात मैत्रीचे नाते दृढ करण्यासाठी या ट्रेक चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आयपीएस परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक चांडक, शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके, ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील, वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश मोरे, परिवहन विभागाचे निरीक्षक लिंगाडे, भिंगार कॅम्पचे निरीक्षक प्रवीण पाटील, कोतवालीचे निरीक्षक विकास वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस दल आणि नागरिक यांनी एकत्र येऊन केलेला हा ट्रेक या दोघांमधील भीतीयुक्त दरी मिटवणारा होता. सकाळी 6.30 वाजता या ट्रेकसाठी डीएसपी चौकातून प्रस्थान झाले. दाट धुक्यातील गारवा सर्वाना आणखीनच ताजतावनं करणारा होता. पोलिस विभागाने नागरिकांसाठी वाहनांची व्यवस्था केली होती. पोलिस बांधव आणि नागरिकांनी एकत्र प्रवास केला. मांजर सुंबा गडाच्या पायथ्याशी स्वप्नाली जंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी वार्मअप केला. नंतर विशाल लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली काहीजण अवघड तर काहीजण सोप्या मार्गाने गडावर पोहोचले. तेथे सर्वांनीच सेल्फीचा आनंद लुटला.

अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनीही हा ट्रेक पूर्ण केला. निसर्गाचा आनंद घेत ’स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर आनंदम या संस्थेच्या शर्वरी मुळे यांनी तणावाचे प्रकार आणि त्यावरील उपाय याची माहिती देत उपस्थितांना बोलते केले. सर्पमित्र हर्षद कटारिया यांनी सापांविषयी असलेल्या अनेक अंधश्रद्धांची माहिती देत सापांना मारू नका असे आवाहन केले.

स्वप्नाली जंबे, कोमल नवले, मनीषा बोगावत, नीलिमा मनवेलीकर, अतुल जैन यांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पोलिसांनीही ट्रेक कॅम्पच्या चांगल्या आयोजनाबद्दल लाहोटी यांच्या टीमचे आभार मानले. यापुढेही पोलिसांनी आपल्या कुटुंबासह ट्रेक कॅम्पमध्ये सामील व्हावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. सर्वांनी गरमागरम कॉफी आणि चटकदार भेळीचा मनमुराद आस्वाद घेतला.

ट्रेक कॅम्प अननोनच्या ‘साद गर्भगिरीला’ हा उपक्रम दर पंधरवाड्याला रविवारी नगर शहराच्या आजूबाजूला डोंगर-दर्‍यांमध्ये ट्रेकचे विनामूल्य राबविण्यात येतो. पोलिसांसमवेत नागरिकांनी दिलेली साद ही नक्कीच एका आनंदी आणि सुरक्षित शहराचा पाया आहे, अशी भावना व्यक्त करत लाहोटी यांनी पोलिसांचे आभार मानले.

Share This Article