Thursday, April 25, 2024
Homeनगरडिझेल चोरांचा पाठलाग करताना राहुरी पोलीस जखमी

डिझेल चोरांचा पाठलाग करताना राहुरी पोलीस जखमी

डिझेलचा ड्रम फेकल्याने वाहन उलटले व दुचाकीही घसरल्या; दे मार चित्रपटाचा थरार राहुरी पोलिसांनी अनुभवला

राहुरी (प्रतिनिधी)- डिझेल चोरांचा पाठलाग करताना चोरट्यांनी राहुरी पोलिसांच्या वाहनापुढे डिझेलचा भरलेला ड्रम फेकल्याने पोलिसांचे वाहन उलटले. यात रात्रीच्या गस्तीतील पोलीस जखमी झाला. तर पाठलाग करणार्‍या दोन दुचाकीही घसरल्या. एखाद्या दे मार चित्रपटाच्या कथानकाला शोभणारा हा थरार राहुरीनजीक नगर-मनमाड महामार्गावर बुधवार दि.18 रोजी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेत पोलिसांच्या खासगी चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ड्रम फेकून डिझेल चोरांचे वाहन सुसाट वेगाने पसार झाले.

- Advertisement -

दरम्यान, जखमी पोहेकॉ. ढाकणे यांना राहुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी, दि. 18 रोजी पोसइ गणेश शेळके हे राहुरी पोलीस ठाण्याच्या सरकारी वाहनाने स्थानिक रात्रगस्त करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली, मारूती सुझुकी शोरूमसमोर नगर-मनमाड महामार्गालगत उभ्या असलेल्या काही ट्रकमधून काही अज्ञात चोरटे डिझेल चोरीत आहेत. अशी माहिती मिळताच त्याचवेळी एक पांढर्‍या रंगाची टाटा नॅनो वाहन क्रमांक एमएच 14 बीटी 8422 ही भरधाव वेगाने कोल्हारच्या दिशेने जाताना दिसली.

शेळके यांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. तसेच याबाबत राहुरी शहरात रात्रगस्त करणारे पोहेकॉ. ढाकणे व पोना. जायभाये यांना कळवून तात्काळ पाठलाग करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत बेलापूर फाटा फिक्स पॉइटवरील कर्मचारी पोकॉ. लगड व पोकॉ. फाटक यांनाही नाकाबंदीबाबत कळविले.

मात्र, त्या नॅनो कारने नाकाबंदीस न जुमानता वेगाने कोल्हारच्या दिशेला गेली. सरकारी वाहनाने तिचा पाठलाग करीत असताना चिंचोली फाटा येथून दुभाजक ओलांडून नॅनो कार पुन्हा राहुरीच्या दिशेने माघारी फिरून येत असताना शेळके यांनी पोहेकॉ. ढाकणे यांना सतर्कपणे पाठलाग करण्याच्या सूचना दिल्या. तेव्हा पोना. जायभाय यांनी त्यांची खासगी कार मारूती ब्रेझा क्र. एमएच 16 बीवाय 4300 या वाहनावरील खासगी चालकासह बेलापूर फाटा ते राहुरीकडे नॅनोकारचा पाठलाग करीत येत होते.

याच दरम्यान मदतीसाठी चार स्थानिक नागरिक दोन दुचाकीसह पोलिसांसमवेत पाठलाग करीत होते. याचवेळी नॅनो गाडीतील अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वाहनातून डिझेलने भरलेला 35 लिटरचा ड्रम रस्त्यात फेकला. रस्त्यावर सर्वत्र डिझेल पडून हॉटेल सर्जा समोरील महामार्गावर ब्रेझा कार डिझेलवर स्लीप होऊन पहाटे सुमारे पावणेचार वा. चे सुमारास उलटून बाजूच्या शेतात जाऊन पडली.

यात पोहेकॉ. ढाकणे यांच्या नाकाला, डोक्यास किरकोळ जखमा झाल्या असून उजवा हात मनगटामध्ये फ्रॅक्चर झाला आहे. तर ब्रेझाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुचाकीवर पाठलाग करणारे स्थानिक नागरिकांच्या दुचाकी स्लीप होऊन त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना राहुरी येथे उपचारासाठी दाखल केलेले आहे. नॅनो कारमधील अज्ञात चोरटे घटनेचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या