Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरपोलिसांनी गुटखा पकडला, पण फिर्यादीच नाही

पोलिसांनी गुटखा पकडला, पण फिर्यादीच नाही

– सचिन दसपुते

अन्न प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने निर्माण झाला पेच

- Advertisement -

अहमदनगर- करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून सर्व उद्योग धंदे बंद आहेत. काहींनी याचा गैरफायदा घेत राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधी तंबाखू, गुटख्याची विक्री चुपके चुपके सुरूच ठेवली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक महिन्यात सहा ठिकाणी छापे टाकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यात असून अन्न प्रशासनाचे अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले नसल्याने गुन्हे दाखल होऊ शकले नाहीत.

यामुळे अवैध गुटखा विक्री करणार्‍यांची पाठराखण तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. करोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन दिवसरात्र करोना हद्दपार करण्यासाठी मेहनत घेत आहे. लोकांनी घरात थांबावे यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. अशा महामारीच्या काळात अवैध धंदे रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस काम करत आहेत. घातक रसायनापासून तयार होणारी दारू असो, सुगंधी तंबाखू, गुटखा असो की जुगार अड्डा असो, सर्वत्र पोलीस छापे टाकून काम करत आहे.

अशाच पद्धतीने जिल्ह्यातील ठिकठिकाणी मशीनच्या सहाय्याने सुगंधी तंबाखूचा वापर करून तयार होणारा मावा, गुटख्यावर गुन्हे शाखेने छापे टाकले. पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार, शेवगाव तालुक्यातील बोधेगावातील दोन ठिकाणी, नेवासा शहरात दोन ठिकाणी, नगर शहरातील भिंगार, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या गुटखा, मावा विक्रीकर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये मावा तयार करण्यासाठी वापरणार्‍या मशीन, वाहतूकसाठी वापरणारे टेम्पो, आरडीएमडी गुटखा, एम कंपनीची सुगंधी तंबाखू, मिक्स सुपारी, कच्ची सुपारी चुरा, तयार मावा, पिशव्या, चुना, हिरा पान मसाला आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

अशा सहा कारवाईत दहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुगंधी तंबाखू, गुटखा यावर महाराष्ट्र शासनाची बंदी आहे. यावर कारवाई करण्यासाठी अन्न प्रशासनाकडे वेळ नसतो. पोलिसांनी कारवाई केल्यास फिर्याद देण्यासाठी हे अधिकारी लवकर येत नाहीत. हा नेहमीचाच प्रकार आहे. परंतु, लॉकडाऊन काळात गुन्हे शाखेने छापे टाकून संबंधित पोलीस ठाण्यात मुद्देमाल जमा केला. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी याबाबत अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कळविले, संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. महिनाभराच्या सहा छाप्यांचा एकही गुन्हा फिर्याद न दिल्याने दाखल होऊ शकला नाही. यामुळे अवैध गुटखा विक्री करणार्‍यांना बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

सर्व उद्योग धंदे बंद असताना गुटखा विक्री जोरात सुरु आहे. छुप्या पद्धतीने मावा तयार करून तो घरपोच करण्याची साखळी निर्माण झाली आहे. अशा अवैध धंद्यांची माहिती अन्न प्रशासनाला नसेल, यावर विश्वास कसा ठेवणार? स्वतः कारवाई करायची नाही व पोलिसांनी केल्यास फिर्याद देण्यासाठी यायचे नाही, असा प्रकार सुरू आहे. गुटखा, मावा विक्री करणार्‍यांवर कारवाई झाल्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. तरच या धंद्याला थोड्याफार प्रमाणात चाप बसेल. मात्र एकूण कारभार पाहता चाप बसणे दूरच, त्यांना प्रोत्साहन मिळेल, अशीच एकूण परिस्थिती आहे.

मग ही फिर्याद का दाखल झाली ?
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून पकडलेल्या सुगंधी तंबाखू, गुटखा या बाबत पंचनामा करायचा, पोलीस ठाण्यात मुद्देमाल जमा करायचा, मग संबंधित पोलिस ठाणे अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कळविणार, अन्न प्रशासन अधिकारी येऊन तो मुद्देमाल हस्तांतरित करणार, मुद्देमालाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणार व मग कायदेशीर कारवाई होणार, असे सर्व अन्न प्रशासनाचे जबाबदार अधिकारी म्हणातात. परंतु, नगर शहर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी 24 एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास दाळमंडई येथील एका जनरल स्टोअर्सवर छापा टाकला. 19 हजार रुपये किंमतीचा हिरा पान मसाला व तंबाखू जप्त केली. छापा टाकल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेला गुटखा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जातो व मगच गुन्हा दाखल केला जाणार असेल तर, दाळमंडईतील छाप्याचा गुन्हा लगेच कसा दाखल झाला, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

अन्न प्रशासनाचे हे उत्तर-
याबाबत अन्न प्रशासन उपायुक्त संजय शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकल्यानंतर मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यात जमा करतात. याबाबत संबंधित पोलीस ठाणे आम्हाला मुद्देमाल हस्तांतरित करतात. लॉकडाऊन काळात जिल्ह्यात पोलिसांनी छापे टाकल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तो सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्याकडून हस्तांतरित केला आहे. सुगंधी तंबाखू, तयार मावा, वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, पानमसाला याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल.’ कोणत्या प्रयोगशाळेत नमुने पाठविले हे सागण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या