Thursday, April 25, 2024
Homeनगरपतसंस्थाचा ठेवीवरील व्याजदर समान ठेवणार

पतसंस्थाचा ठेवीवरील व्याजदर समान ठेवणार

राहुरी तालुक्यातील पतसंस्था चालकांच्या बैठकीतील निर्णय

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील सर्व पतसंस्थांच्या ठेवीवरील व्याजदर नऊ टक्के करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पतसंस्थांच्या चालकांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पतसंस्था अध्यक्षांच्या बैठकीत एकच व्याजदर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

राहुरी तालुक्यात असलेल्या पतसंस्थांचे व्याजाचे दर भिन्न आहेत. सर्व पतसंस्थांचे व्याजदर एकच असावे, अशी मागणी अनेक पतसंस्था करीत होत्या. यासंदर्भात राहुरी येथे बैठक घेण्यात आली. एक वर्षासाठी ठेवीवरील व्याजदर नऊ टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का व्याजदर अधिक देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. चारटक्के मार्जिन ठेवून कर्जाचा दर ठरविण्यात यावा, असेही निर्णय बैठकीत घेण्यात आले. रिकरींग एजंटला अडीच टक्केच कमिशन देण्यात यावे, ठेवीवरील मासिक व्याजदर साडेआठ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष वाबळे म्हणाले, पतसंस्थांचे व्याजदर एकच रहावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. पतसंस्थांकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून ठेवींचे प्रमाण वाढत आहे. पतसंस्थांच्या अध्यक्षांची दर दोन महिन्याला बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश पारख यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत शामराव निमसे, बजरंग तनपुरे, शिवाजीराव कपाळे, आसाराम ढूस, हर्षद तनपुरे, भाऊसाहेब येवले, सूर्यकांत भुजाडी, श्याम ओझा, संजय शिरसागर, डॉ. दिलीप धनवटे, राजेंद्र जाधव, अण्णासाहेब चोथे आदींनी भाग घेतला.

करोनाचे संकट असताना पतसंस्थांनी चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे पतसंस्थांची विश्वासार्हता वाढण्यास मदत झाली आहे. पर्यायी पद्धत संस्थांकडे ठेवी वाढत आहे. सर्व पतसंस्थांनी एकच व्याजदर केल्यामुळे गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. भविष्यकाळातही पतसंस्थांना उज्ज्वल भवितव्य आहे.
– सुरेशराव वाबळे, अध्यक्ष प्रेरणा पतसंस्था.

नोटाबंदीसारखे मोठे संकट समोर उभे असताना पतसंस्था त्यातून पारदर्शी कारभारामुळे समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यानंतर आता करोनासारखे मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यातूनही पुन्हा अर्थसंजीवनी मिळण्यासाठी पतसंस्था चालक, संचालक, कर्मचारी, दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी, सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या सहकार्याने मोठ्या हिंमतीने वाटचाल सुरू आहे. करोनाच्या लॉकडाऊनमध्ये पतसंस्थेकडे पुन्हा आर्थिक व्यवहार वाढण्यासाठी अनेकविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचा फायदा पतसंस्था चळवळीबरोबरच ग्राहकांना व व्यापार्‍यांनाही होणार आहे.
– शिवाजीराव कपाळे, अध्यक्ष साई आदर्श मल्टीस्टेट, राहुरी फॅक्टरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या