शेवग्याच्या शेंगा विकायला मुंबईला गेला अन् पाथर्डीत करोना घेऊन आला

शेवग्याच्या शेंगा विकायला मुंबईला गेला अन् पाथर्डीत करोना घेऊन आला
शेवगा विकण्यास गेलेल्या शेतकर्‍यावर संकट
अहमदनगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील 45 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात हा रुग्ण मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगा विकायला गेला होता. त्या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा विकल्या मात्र, फुकटचा करोनाचा प्रसाद घेऊन आला. या रुग्णामुळे पाथर्डी तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता 44 झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शांत असणार जिल्हा पुन्हा हादरला आहे. बाधीत व्यक्तीही शेतमाल (शेवग्याच्या शेंगा) घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता 44 झाली आहे.
नेवासा : सारीतून करोना पॉझिटिव्हवर पुण्यात उपचार

जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील एका रुग्णाला सारीचा त्रास होत होत होता. या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा त्रास वाढल्याने त्याला 12 एप्रिलला पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. जाण्यापूर्वी त्याची करोनाची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आलेला आहे.

विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश देवू नका : जिल्हाधिकारी
गेल्या 6 दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा बाधीत रुग्ण आढळल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. विनापरवानगी कोणालाही जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश देण्यात येऊ नये, अधिकृत परवानगी असेल त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, तसेच जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यावर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून आणि परराज्यातून जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे अधिक दक्षतेने जिल्हा सीमेवर तपासणी गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

17 बाधितांवर उपचार सुरू
जिल्ह्यातील पाच रुग्णाचे अहवाल रिपिट पॉझिटिव्ह आलेले आहेत. 14 दिवसांचा क्वारंटाईननंतर हे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर 17 व्यक्तींचे अहवाल पुण्याच्या लष्कराच्या प्रयोग शाळेने रिजेक्ट केलेले असून शनिवारी आणखी दहा अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यातून 1 हजार 559 व्यक्तींची करोना चाचणी करण्यात अ ाली असून त्यात 1 हजार 481 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे. तर 2 बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com