Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरउद्यापासून पालकांना मिळणार ‘एसएमएस’

उद्यापासून पालकांना मिळणार ‘एसएमएस’

25 टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन सोडतीची प्रक्रिया पूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी काल मंगळवारी राज्य स्तरावर ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. यानंतर आता उद्यापासून (गुरुवार) विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे पालकांनी कागदपत्र पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. याबाबत वेबसाईटवर सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी यावेळी ऑनलाईन सोडत प्रक्रियेत बदल केला होता. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोडत काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना लॉटरीत नाव किंवा प्रतीक्षा यादीत नाव आहे, असे एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. हे एसएमएस गुरुवारपासून मिळतील. त्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे, असे असले तरी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, अशा सूचना संचालनालयाने दिल्या आहेत. याबाबत पुढील सूचना वेबसाईटवर देण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांत त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यात कार्यवाही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील 393 शाळा पात्र ठरल्या. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.

पुढे यास 4 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या काळात राज्यभरात एकूण 2 लाख 91 हजार 660 अर्ज आले आहेत. यंदा शिक्षण विभागाने या प्रक्रियेत बदल केला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे विभागाचे नियोजन आहे. त्यामुळे एकच सोडत होती. त्यामुळे या प्रक्रियेतील वेळ कमी होणार आहे. याआधी तीन ते चार वेळा सोडत काढण्यात येत होती. तरीदेखील जागा रिक्त राहात होत्या. या वेळी मात्र असे होणार नाही. एकच सोडत काढण्यात येणार असून, जितक्या रिक्त जागा असतील, त्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी राहणार आहे, असे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या