Friday, April 26, 2024
Homeनगरपेपर तपासणी कामी असणार्‍या शिक्षकांना संचारबंदीतून सवलत

पेपर तपासणी कामी असणार्‍या शिक्षकांना संचारबंदीतून सवलत

संगमनेर (वार्ताहर) – दहावी बारावीचे निकाल वेळेत लागण्यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व लॉकडाऊन काळात उत्तर पत्रिका तपासणीसाठी संबंधित कर्मचार्‍यांना संचारबंदीतून शिथिलता देण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. या सवलती देण्यात आल्यामुळे निकाल वेळेत लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर सुमारे 20 मार्च पासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे शाळा स्तरावर उपलब्ध झालेले उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पुढे सरकू शकलेले नाही. स्थानिक पातळीवर पेपर तपासणी करून ते पेपर मॉडरेटरकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर सदरचे पेपर विभागीय बोर्डाकडे तपासणीसाठी जातात. त्यावर उचित कार्यवाही होऊन निकाल राज्य मंडळाकडे सादर करण्यात येतो. त्यानंतर अधिकृत निकाल घोषित करण्यात येतो. ही बाब लक्षात घेता राज्यात स्थानिक पातळीवरती संचारबंदी जाहीर झाल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाणे शक्य होत नाहीत. ज्यांनी पेपर तपासले त्यांना मॉडरेटरकडे पेपर पोहोचविता येत नाहीत.

- Advertisement -

त्यामुळे बोर्डासमोर वेळेत निकाल लावण्याची समस्या निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता परीक्षेसंबंधी काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रवासाकरिता परवानगी देण्याचा विचार सुरू होता. त्यांना आता संचारबंदीतून सवलत देण्याचा आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. यासाठी उत्तर पत्रिका परीक्षा केंद्रावरून पोस्टात किंवा माध्यमिक शाळाकडे मॉडरेटकडे पाठविणे.

शिक्षक अथवा शिपायामार्फत उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे, परीक्षकांकडून नियमकाकडे उत्तर पत्रिका पोचविणे. नियमकाकडील उत्तर पत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे. परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी चौकशी करण्यासाठी मंडळाच्या अधिकार्‍यांना प्रवास करणे आदी कामासाठी सवलत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदरच्या सवलती देत असताना संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतःचे ओळखपत्र व मंडळाचे आदेश जवळ बाळगणे आवश्यक असणार आहेत.

अधिकार्‍यांना तपासणीकामी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. यासोबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अधिनस्त असलेल्या नऊ विभागीय मंडळातील अधिकारी कर्मचारी व शिक्षक यांना प्रवास करता येणार आहे. यासाठी खासगी व सार्वजनिक वाहन वापरता येईल. अथवा वाहतुकीसाठी मंडळाच्या मान्य ठेकेदाराकडून वाहने भाडेतत्त्वावर वापरता येणार आहेत.

ठेकेदाराकडून अशा कर्मचार्‍यांची स्वाक्षरी यादी कार्यालयाने प्रमाणित करून देणे आवश्यक राहील. अशा कामासाठी वाहन वापरावयाचे असेल तर वाहनाचा क्रमांक व त्याचा तपशील यासंदर्भातील आदेश विभागीय मंडळाने काढणे आवश्यक असून त्याची प्रत वाहनाच्या दर्शनी भागावर चिटकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

10 जूनपूर्वी लागतील निकाल
इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे मे जूनच्या दरम्यान निकाल लागणे अभिप्रेत असतेच, पण अत्यंत गंभीर परिस्थिती यावर्षी निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाला इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला होता. या सर्व परिस्थितीत पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश होण्याच्यादृष्टीने निकाल वेळेत लागणे अनिवार्य आहे. या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दहावी-बारावीचे निकाल 10 जून पर्यंत घोषित करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन संबंधित कर्मचारी व शिक्षकांना सवलतीचे पास उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशामुळे पेपर तपासणीच्या कामाला गती येऊन परीक्षा मंडळाची निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन येत्या महिनाभरात निकालाची प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले जाईल असे बोलले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या