Wednesday, April 24, 2024
Homeनगरपंचायत समितीत विरोधी सदस्यांच्या हक्कावर गदा

पंचायत समितीत विरोधी सदस्यांच्या हक्कावर गदा

चौकशीसाठी डॉ. वंदना मुरकुटेंचा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे अर्ज

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पंचायत समितीमध्ये विरोधी सदस्यांना हेतुपुरस्सरपणे उशिरा मासिक मिटींगची नोटीस व प्रोसिडींग देऊन सत्ताधारी नियमांची पायमल्ली करीत आहेत. आमच्या हक्कावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

काल श्रीरामपूर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक सहाय्यक गटविकास अधिकारी रामराव कडलग यांच्या अध्यक्षतेखाली, सभापती संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक, डॉ.वंदना मुरकुटे, कल्याणी कानडे यांच्या उपस्थितीत झाली. अन्य चार सदस्यांनी मात्र सभेकडे पाठ फिरविली.

बैठकीत महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांनी कामाचा आढावा सादर केला. तर तालुक्यातील 12 शाळांच्या इमारती दुरूस्त करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

भोकर येथील पाणी योजनेचे काम नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दखल घेत चांगल्याप्रकारे करण्याची सूचना सभापती संगीता शिंदे यांनी अधिकार्‍यांना केली. तसेच कोरोना बाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध शिबिरे घेण्याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केली.

उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी पंचायत समितीच्या विविध विभागातील रिक्त पदांबाबत माहिती घेऊन याबाबत वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे सांगितले.

पं.स. सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी पंचायत समितीच्या स्वच्छतागृहाची वेळेवर स्वच्छता होत नसल्याने सभा सुरू असलेल्या सभागृहात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. नाही तर सभेची जागाच बदला असा सल्लाही त्यांनी दिला.

नियमाप्रमाणे मासिक मिटींगची नोटीस 7 दिवस अगोदर देणे गरजेचे असते. परंतु विरोधी सदस्यांना जाणिवपूर्वक मिटींगचा अजेंडा व प्रोसिडींगची नक्कल उशिरा देण्यात येते. काल दि. 18 फेबु्रवारी रोजी झालेल्या मिटींगची नोटीस व प्रोसिडींग नक्कल दि. 17 फेबु्रवारी रोजी रात्री 9 वाजता मिळाल्याचेही डॉ. वंदना मुरकुटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

सभेच्या शेवटच्या टप्प्यात सभापती संगीता शिंदे गेल्या निघून !
मासिक आढावा बैठकीत विविध विभागाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या कामकाजाची माहिती सादर केली. सभा शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपल्यानंतर आर्थिक अंदाजपत्रक सादर करत असताना तसेच ऐनवेळचे विषय वाचन करणे बाकी असतानाच सभापती संगीता शिंदे या एका कार्यक्रमास सभेतून निघून गेल्या. पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ग्रामीण भागातील विकास कामाच्या मुद्यांवर चर्चा केली जाते, असे असताना अंदाजपत्रकाचे वाचन सुरू असताना तसेच ऐनवेळचे विषय येणे बाकी असताना सभा संपल्याचे जाहीर करण्याअगोदरच सभापती निघून गेल्याबद्दल पं.स. सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. तर महत्त्वाचे काम असल्यास बैठकीची तारीख पुढे ढकलणे गरजेचे आहे,मात्र अशाप्रकारे अर्धवट सभा सोडून जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या