Friday, April 26, 2024
Homeनगरपढेगावात सत्कारावरून रंगले ‘मानापमान‘ नाट्य !

पढेगावात सत्कारावरून रंगले ‘मानापमान‘ नाट्य !

सचीन गुजर संतापले; श्रीरामपुरात मनधरणीनंतर पडला वादावर पडदा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील पढेगाव येथे काल आयोजित करण्यात आलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर सोसायटीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर यांचा नामोल्लेख टाळल्याने मोठे ‘मानापमान’ नाट्य रंगले. संतापलेल्या गुजर यांनी सरळ कार्यक्रम सोडून श्रीरामपूर गाठले. त्यानंतर श्रीरामपुरात त्यांची मनधरणी केल्याने या वादावर अखेर पडदा पडला.

- Advertisement -

तालुक्यातील पढेगाव येथे स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांना त्याचे निमंत्रण देण्यात आले. निमंत्रणावरून नेते आलेही. या कार्यक्रमात कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व बँक अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सचीन गुजर यांचा नामोल्लेख टाळण्यात आला.

हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण चहासाठी बँकेतून खाली आले. मात्र त्याठिकाणी बसायला जागा अपुरी असल्याने ग्रामपंचायत कार्यालयात बसण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या सत्कारासाठी चार बुके आणले. याठिकाणी सचीन गुुजर यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, जि.प. बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री मगर उपस्थित होते.

संयोजकांनी करण ससाणे, अरुण पाटील नाईक, सुधीर नवले यांचा सत्कार केला. त्यांतर एकच बुके शिल्लक राहिला. त्यामुळे आता सत्कार कुणाचा करावा या पेचात सापडलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर लिप्टे यांनी ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब दिघे यांच्या नावानंतर सचीन गुजर यांचे नाव घेण्याअगोदर आपले नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करुन माझा अपमान होत असेल तर येथे थांबून काय उपयोग? असा सवाल केला. यावेळी लिप्टे व गुजर यांच्यात शाब्दीक चकमक झाली. गुजर यांनी मला येथे थांबायचे नाही, ससाणे तुम्ही चला असे म्हणत ग्रामपंचायत कार्यालय सोडले. ससाणे व इतर पदाधिकार्‍यांसमवेत ते श्रीरामपूरला निघून आले.

त्यानंतर काही वेळाने पढेगावचे काही कार्यकर्ते गुजर यांची मनधरणी करण्यासाठी श्रीरामपुरात आले. करण ससाणे यांच्या निवास्थानी हे कार्यकर्ते जमले. तेथून गुजर यांच्या तरी गेले मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने या कार्यकर्त्यांना माघारी परतावे लागले. शेवटी ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, करण ससाणे, सुधीर नवले आदींनी मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकला.

बुके चार और आदमी सात !
पढेगाव येथे आलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यासाठी आयोजकांनी चार बुके आणले होते. मात्र मान्यवर सात होते. तीन पदाधिकार्‍यांचे सत्कार करण्यात आले. मात्र बुके एकच शिल्लक राहिला चार जणांचा सन्मान करणे बाकी होते. ‘बुके चार आणि सत्कारमूर्ती सात’ असल्याने हे मानापमान नाट्य घडल्याचे काँग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकार्‍याने सार्वमतशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या