Thursday, April 25, 2024
Homeनगरपाचेगावात बाहेरगावाहून आलेल्या 45 व्यक्तींना ठेवले विलगीकरण कक्षात

पाचेगावात बाहेरगावाहून आलेल्या 45 व्यक्तींना ठेवले विलगीकरण कक्षात

पाचेगाव (वार्ताहर)- दुसर्‍या ठिकाणी गेलेल्या व्यक्तींनी आता आपल्या गावाकडचा रस्ता धरला असून पाचेगावात अशा बाहेरुन आलेल्या 45 व्यक्तींना नुकतेच 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना माध्यमिक विद्यालयात बनवलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून करोनाच्या धास्तीने गावातून गेलेले मजूर अडकून पडले होते.गावागावात बाहेरून आलेल्या मजूर यांची गावातील माध्यमिक, प्राथमिक शाळा या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करून राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली आहे. या आलेल्या लोकांच्या देखरेखीसाठी दिवसरात्र गावातील ग्रामपंचायत व सहकारी संस्थेतील कर्मचार्‍यांच्या नेमुणूका करण्यात आली आहे.

- Advertisement -

या क्वारंटाईन व्यक्तींना गावातील किराणा व्यापार्‍यांकडून किराणा देण्यात आला आहे.तसेच गावात भाजीपाला घेऊन फिरणार्‍या शेतकर्‍यांकडून भाजीपाला देण्यात आला आहे. बाहेरून आलेले जवळपास 45 व्यक्तीना आरोग्य यंत्रणेकडून क्वारंटाईन करण्यात आले असून या व्यक्ती शिरूर कासार (जि. बीड), नेमणे पारगाव (ता. बारामती), गंगापूर (जि.औरंगाबाद), इंदोर (मध्यप्रदेश) तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, नेवासा आदी ठिकाणाहून गावी परतलेल्या आहेत.

वरील सर्व व्यक्तींना गावातील माध्यमिक विद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांना राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून देखरेख करण्यात येत आहे. अजून काही मजूर गावात येणे बाकी आहे. मजूर वा काही पाहुणे आल्यास ग्रामपंचायत प्रशासनास सांगण्यात येवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना सहकार्य करण्यासाठी गावातील तलाठी गणेश जाधव व ग्रामसेवक गणपत डोगरे हे दोन दिवस गावात तळ ठोकून होते.त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

तालुक्यात क्वारंटाईन केलेले नागरिक मोठ्या संख्येने आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावात नवीन येणार्‍या नागरिकांना क्वारंटाईन करून गावातील शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करून त्यांची देखभाल करण्यात येत आहे. तरी क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनास सहकार्य करुन या लढाईत आपले योगदान द्यावे.
– गणेश जाधव, कामगार तलाठी, पाचेगाव

जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्ती आपल्या गावातीलच आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या व्यक्तींना क्वारंटाईन करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या व्यक्तींनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच त्या व्यक्तींनाही ग्रामस्थांनी सहकार्य करुन करोना महामारीशी एकजुटीने लढा द्यावा.
-प्रकाश जाधव, अध्यक्ष, पाचेगाव सोसायटी

आपल्या गावात या करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कायमस्वरूपी अग्रेसर आहे.संपूर्ण गावात जंतुनाशक फवारीन करण्यात आली होती. गावात ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी ग्रामस्थांना सूचना देण्यात येत आहे. बाहेरून येणार्‍या नागरिकांना वर लक्ष दिले जात आहे. गावात विनाकारण नागरिक फिरताना आढळल्यास त्यांना समज देण्यात येत आहे.तरी राज्यात वाढती संख्या पाहून आपण आपली काळजी घ्यावी.
– श्रीकांत पवार उपसरपंच, पाचेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या