Type to search

Featured नाशिक राजकीय

भाजप गट संमेलनाकडे इच्छुकांची पाठ; देवळाली मतदारसंघासाठी 19 पैकी केवळ चौघांचीच उपस्थिती

Share

दे. कॅम्प । वार्ताहर

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी कधी नव्हे एवढी भाजपकडे इच्छुकांची रिघ लागली आहे. परंतु संघटन शक्तीवर विश्वास असलेल्या या पक्षाने आयोजित केलेल्या गट संमेलनाकडे 19 पैकी अवघ्या चौघांनीच हजेरी लावल्याने पक्षाच्या वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

सन 1990 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनलेला देवळाली मतदारसंघ सर करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली असली तरी पक्षीय पातळीवर मात्र त्याचे पितळ मेळाव्याच्या निमित्ताने उघड पडले आहे. माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत देवळालीचे गट संमेलन आयोजित करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे वरिष्ठ नेते असल्याने अहिर यांना झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. त्यांच्या आगमनाची परिसरात एकच चर्चा झाली.

येथील झुलेलाल मंदिरात आयोजित गट संमेलनात 251 बुथमधील केंद्रप्रमुख, शक्तीप्रमुख व पेज प्रमुख यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. त्या दृष्टीने संघटन मंत्री, विस्तारक, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी यांच्यावर विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आली होती. या मतदार संघाचे पक्षाचे विस्तारक वैभव फेंडर हे गेल्या महिनाभरापासून यासाठी कार्यरत होते. मात्र त्यांना पक्षाचे लोकप्रतिनिधी अथवा इच्छुक उमेदवारांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे या मेळाव्यावरून दिसून आले.

मेळाव्यास अहिर यांनी संबोधित करताना पक्ष संघटनेचे महत्त्व विशद केले व या ठिकाणी किती बुथप्रमुख उपस्थित आहेत, त्यांची हजेरी घेतली. मतदार संघात 251 बुथ असताना उपस्थिती मात्र 10 ते 12 होती. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण दिले. पक्षाच्या कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहून समोर बसतात, ही वस्तुस्थिती आहे, याचे भान येथील पदाधिकार्‍यांनी ठेवावे, असा सूचक इशारा दिली.

सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीन मतदारसंघात मनसेना विजयी होत असताना देवळालीत मात्र शिवसेनेने गड राखला होता. 2014 मध्ये शहरातील तिन्ही मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. तरीही या मतदारसंघात शिवसेनेनेच बाजी मारली होती. ही आकडेवारी अहिर यांनी जाणून घेतली.

पक्षाच्या इच्छुकांनी युती होवो अथवा ना होवो, हा मतदार संघ भाजपकडे आल्यास कमळ फुलविण्याची जबाबदारी घेतली. त्यात पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हासरचिटणीस प्रीतम आढाव, मनपा नगरसेविका सरोज आहिरे यांनी आपला मनोदय व्यक्त केला. तर या मेळाव्यास इतर इच्छुकांपैकी प्रा. कुणाल वाघ व मनपा नगरसेवक कन्हैय्या साळवे यांची उपस्थिती होती. मात्र इतरांनी या गट संमेलनाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!