Thursday, April 25, 2024
Homeनगरकांद्याचे भाव गडगडले; शेतकर्‍यांपुढे मोठे संकट

कांद्याचे भाव गडगडले; शेतकर्‍यांपुढे मोठे संकट

‘लॉकडाऊन’ मुळे मालाला भाव नाही; आर्थिक चणचणीमुळे नाईलाजाने कांदा विक्री

पुणतांबा (वार्ताहर) – कांद्याचे भाव गेल्या चार दिवसात 2200 रुपयावरून 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल घसरल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात डोळ्यात पाणी आणण्याची वेळ आली आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यात लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

- Advertisement -

पाच महिन्यापूर्वी 2100 रुपये प्राति क्विंटल दर मिळालेला कांदा आता दर कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गाला रडविण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे व पाऊस पाणी समाधानकारक असल्यामुळे चालू वर्षी परिसरात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली होती. शेतकर्‍यांनी त्यासाठी खर्चही खूप केला होता.

एक एकर कांदा पिकासाठी मशागत खर्च किमान 5000 रुपये रोप, 20000 रुपये, लागवड 9500 रुपये, फवारणी 10000 रुपये, खुरपणी 4000 रूपये, काढणी 9500 रुपये, कांदा गोणी 30 रूपये, टेम्पोत गोणी भरणे प्रति गोणी 10 रुपये, टेम्पो भाडे प्रति गोणी 30 रुपये, बाजार समिती हमाली तोलाई प्रति गोणी 10 रुपये असा किमान खर्च आहे. चालू वर्षी वातावरणातील बदलामुळे सरासरी एकरी उत्पादन 125 क्विंटलपर्यंत आहे. उत्पादन खर्च एकरी 80 ते 90 हजारापर्यंत होतो.

सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील कांदा खरेदी करणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. तर स्थानिक व्यापारी अत्यंत कमी भावात खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सलग दोन वर्ष नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पैशाची चणचण असल्यामुळे गरजेनुसार मालाची विक्री नाईलाजाने करत आहे. सध्या तरी कांद्याच्या भावामुळे पुणतांबा परिसरातील शेतकरी अडचणीत आला आहे, असे कांदा उत्पादक शेतकरी अभय धनवटे, नितीन सांबारे, संजय जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या