Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजानेवारी उजाडला तरी कांदा लागवड सुरूच !

जानेवारी उजाडला तरी कांदा लागवड सुरूच !

श्रीरामपूर तालुक्यात चार हजार 684 हेक्टरवर लागवड; जानेवारीअखेरपर्यंत लागवड सुरू राहण्याची शक्यता

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- चालू वर्षी कांदा दराने उच्चांकी ओलांडली. त्यामुळे कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. तालुक्यात डिसेंबर अखेरपर्यंत चार हजार 684 हेक्टरवर कांद्याची लागवड पूर्ण झाली असून 20 जानेवारीपर्यंत लागवड सुरू राहण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यंदा मुबलक पाणी आहे; मात्र हवामान अनुकूल नसल्याने कांदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत कांद्याची लागवड पूर्ण केली जाते. मात्र यंदा सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात कांदा रोपांचे नुकसान झाले. पर्यायाने कांदा रोपांच्या टंचाईमुळे अनेक शेतकर्‍यांनी पीक नियोजनात बदल केला. तर अनेकांनी रोप न मिळाल्याने पर्याय शोधत कांदा पेरणी केली आहे. तर अनेकांनी दुबार कांद्याचे रोपे टाकल्याने ती लागवड जानेवारी अखेरपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सध्या महिला मजूरही फक्त कांदा लागवडीच्या कामात व्यग्र असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याअभावी कांद्याचे क्षेत्र घटले होते. त्यातच सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. याचा फायदा काही प्रमाणात शेतकर्‍यांना तर व्यापार्‍यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे.

पर्यायाने चालू वर्षी कांदा पिकाकडे शेतकरी वळला आहे. मात्र अतिवृष्टीमुळे रोपे गेल्याने नियोजन कोलमडले. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी कांदा रोपे विकत घेऊन लागवडी पूर्ण केल्या. रोपांच्या टंचाईमुळे कांदा रोपाला यंदा सोन्याचा भाव मिळाला. तर काही शेतकर्‍यांनी कांदा रोपे टाकून उशिराने लागवड करण्यापेक्षा कांदा पेरणीस प्राधान्य दिले. तर ज्या शेतकर्‍यांनी दुबार कांद्याची रोपे टाकली ती रोपे सध्या लागवडीस आली आहेत. त्यामुळे जानेवारी महिना उजाडला तरी कांदा लागवडी सुरुच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, चालू वर्षी अतिवृष्टीमुळे पाणी पातळीत वाढ झालेली आहे. मात्र पिकांसाठी अनुकूल हवामान नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. तर मका पिकावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.
एकंदरीत सततच्या ढगाळ हवामानामुळे व थंडीचे प्रमाण कमी असल्याने रब्बी पिकांवर रोगाचे सावट दिसत आहे.

तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लागवड झालेल्या कांदा पिकाचीही वाढ अनुकूल हवामानाअभावी खुंटली आहे. त्यामुळे सध्या शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात औषध फवारणीवर खर्च होत आहे. मागील वर्षी तालुक्यात चार हजार 234 हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती. चालू वर्षी जवळपास तेवढा टप्पा कांदा लागवडीने गाठला आहे. मात्र उशिराने टाकलेली कांदा रोपांची लागवड जानेवारी अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याने कांदा लागवडीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आंतरपिकातून कांदा लागवड वाढली
यंदा पाणी मुबलक असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे तालुक्यात ऊस पिकामध्ये अनेक शेतकर्‍यांनी आंतरपीक म्हणून कांद्याचे पीक घेतले आहे. त्यामुळे आंतर पिकातूनही कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या