Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘ओड़ीएफ’चे पथक आले अन् महापालिकेत पळापळ

Share
‘ओड़ीएफ’चे पथक आले अन् महापालिकेत पळापळ, latest news, odf team, amc, cheking, ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारचे ‘ओडीएफ’ तपासणी पथक आले अन् महापालिकेत एकच धावपळ उडाली. बुधवारी दिवसभर या पथकासमवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरत होते. एवढेच नव्हे, जेथे सार्वजनिक शौचालय आहेत, तेथे रंगरंगोटी, सडा रांगोळी, रोपे लावलेल्या कुंड्या ठेऊन चकचकाट करण्यात आला. सर्वच सार्वजनिक शौचालयांत मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.

केंद्र सरकारच्या पथकाकडून सार्वजनिक शौचालय व स्वच्छता सर्वेक्षण सुरू आहे. या दोन्ही कामांसाठी स्वतंत्र तपासणी पथक आहे. त्यातील सार्वजनिक शौचालयाचे पथक शहरात आल्यानंतर लोकेशनसाठी महापालिकेच्या संपर्कात असते. मात्र स्वच्छता सर्वेक्षणसाठीचे पथक कधी येणार, आले का, येऊन गेले का, याची काहीच माहिती महापालिकेला नसते.

स्वच्छतेचे लोकेशन अगोदर अ‍ॅपवर लोड केलेले असल्याने त्याप्रमाणेच हे पथक परस्पर जाऊन तपासणी करतात, तेथील नागरिकांशी संवाद साधतात. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाला देखील आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहणी करायला जायचे, याची माहिती अगोदर नसते. वरिष्ठांकडून त्याची माहिती ऐनवेळी देण्यात येते.

शौचालयाच्या पाहणीसाठी आलेले पथक उद्यापर्यंत नगरमध्ये राहण्याची शक्यता आहे. या पथकाकडून शौचालयाच्या परिसरासह शौचालयातील स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, रात्रीच्यावेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था आहे का, शौचालयाच्या आजुबाजूला स्वच्छता आहे का, संबंधित परिसराची लोकसंख्या आणि शौचालय याचा ताळमेळ आहे का, सर्व सीट्स व्यवस्थित आहेत का, त्याचा वापर स्थानिक लोक करतात का, महिलांसाठी तेथे काही अडचण आहे का, त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात आली आहे का, दिव्यांगांना शौचालयात येणे जाणे सोयिस्कर आहे का, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जातात का, आदींची पाहणी केली जाते. त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला जातो. तेथील फोटो काढून ते अ‍ॅपवर लोड केले जातात.

‘ओडीएफ’मध्ये प्लस रिमार्क मिळालेला आहे. आता डबल प्लस घेण्याची महापालिकेची तयारी आहे. स्वच्छ भारत योजनेंतर्गत हागणदारीमुक्त आणि शौचालय तपासणीसाठी पाचशे गुण आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!