Thursday, April 25, 2024
Homeनगरनॉन कोव्हिड विलगीकरण कार्यवाहीसंदर्भात आदेश जारी

नॉन कोव्हिड विलगीकरण कार्यवाहीसंदर्भात आदेश जारी

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना चाचणी अहवाल नकारात्मक आलेल्या तसेच नॉन कोव्हिड संस्थांमधील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी व ग्रामपातळीवर संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींच्या अनुषंगाने विविध मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

- Advertisement -

ज्या रुग्णांची करोना चाचणी अहवाल नकारात्मक आलेला आहे व ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी असून त्यांना इतर कोणताही आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचा आजार इत्यादी) नाही, त्यांना 14 दिवसांसाठी घरातच विलगीकरण करण्यात यावे. तसेच ज्या रुग्णांचा चाचणी अहवाल नकारात्मक आलेला आहे व ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांना इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचा आजार इत्यादी) आहे. त्यांना 10 दिवस तालुकास्तरावरील संस्थेत संस्थात्मक विलगीकरण करावे व त्यानंतर 7 दिवस घरातच विलगीकरण करण्यात यावे.

नॉन कोव्हिड संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी- योग्य पीपीई किट वापरत असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना संस्थांत्मक विलगीकरणाची आवश्यकता नाही. अति जोखमीच्या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण, घरात विलगीकरण, निश्चित केलेले विलगीकरण केंद्र या ठिकाणी ठेवण्यात यावे. तसेच 5 व्या व 12 व्या दिवशी त्यांचे नमुने तपासणीकामी पाठविण्यात यावेत. तपासणी अहवाल नकारात्मक आल्यास सदर कर्मचारी 15 व्या दिवशी कामावर रुजू होऊ शकतील. कमी जोखीम संपर्कात असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांचे घरी विलगीकरण करावे. त्यांच्या लक्षणांची नियमित तपासणी करण्यात यावी.

बाहेरून तालुकास्तरावर वास्तव्यास आलेल्या व्यक्तींचे 10 दिवस तालुकास्तरावर संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. व त्यानंतर हातावर शिक्का मारून 7 दिवसांसाठी घरात विलगीकरण करण्यात यावे. तालुकास्तरावरील घरात विलगीकरण असलेल्या व्यक्ती त्या घरीच विलगीकरणात राहतील याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरणाची असेल. सदर व्यक्तींची आरोग्यविषयक तपासणी आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत करून घेण्यात यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या