Friday, April 26, 2024
Homeनगरनिपाणीत गोळीबार : तरुण ठार

निपाणीत गोळीबार : तरुण ठार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटे वस्ती भागात जागेच्या वादातून एका तरुणावर काल रात्री गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटे वस्ती येथे जागेच्या वादातून साळवे आणि हल्लेखोरांमध्ये भांडणे सुरू होती. दोन तास झालेतरी हा वाद मिटत नव्हता. या वादात राजू नामक तरूणाने गणेश साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणी वडगाव) या तरुणावर काल रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार केला. तसेच दहा ते बारा जणांनी तलवार व गावठी कट्ट्याच्या सहाय्याने त्याच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

त्याच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने शहरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृत्यू गोळी लागून झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करत होते. रुग्णालयामध्ये मयताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या