Friday, April 26, 2024
Homeनगरनिमोणमधील दोन महिला आणि अकोलेतील शिक्षकास करोना

निमोणमधील दोन महिला आणि अकोलेतील शिक्षकास करोना

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू;  जिल्ह्यातील करोना बाधीत रुग्णांची संख्या ७४
अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना करोनाची लागण झाली आहे. 19 मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 74 झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
19 मे रोजी नाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील आहे. त्याची आई आणि पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
52 रुग्णांची करोनावर मात
शनिवारी बूथ हॉस्पिटलमधून तिघा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील 74 करोना बाधित रुग्णांपैकी आता 52 जण करोनामुक्त झाले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 16 जण रुग्णालयात उपचार घेत असून यातील काही रुग्ण नाशिकच्या रुग्णालयात दाखल आहेत. करोनामुक्त झालेले तीन पैकी दोनजण नगर शहरातील सुभेदारगल्ली येथील तर एक जण वंजारगल्ली येथील आहे. या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असल्याने या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

1 हजार 851 स्त्राव निगेटिव्ह
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्यावतीने 1 हजार 986 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 1 हजार 851 व्यक्तींचे स्त्राव निगेटिव्ह आले असून 74 व्यक्तींचे अहवाल करोनाबाधित आले आहेत.

नगरच्या लॅबमध्ये चाचणी सुरू
नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. शनिवारी 15 संशयित व्यक्तींच्या घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील 10 अहवाल निगेटिव्ह आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित चार व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
मुंबईकरांचा नगरकरांना धोका वाढला
मुंबईचे अनेकजण नगर जिल्ह्यात आसरा घेऊ लागले आहेत. त्यामुळे नगरकरांना धोका वाढला आहे. कर्जतमधील राशीनमध्ये मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर महिलेचा तीन दिवसांपूर्वी करोनाने मृत्यू झाला. तसेच मुंबईहून पाथर्डीत परतलेल्या महिलेलाही करोनाची बाधा झाली.आता मुंबईहून आपल्या मूळ गावी परतलेल्या शिक्षकासही करोनाची बाधा झाली आहे. श्रीरामपुरातही मुंबईहून आलेल्या दोन व्यक्तींना तपासणीसाठी नगरला हलविण्यात आले आहे.

नातेवाईक क्वारंटाईन, लिंगदेव सील

अकोले (प्रतिनिधी)-अहमदनगर, जामखेड, संगमनेर तालुक्यात करोनाने धुमाकूळ घातलेला असतानाच आता अकोले तालुक्यातही करोनाने शिरकाव केला आहे. मुंबईहून मूळगावी लिंगदेव येथे आलेल्या शिक्षकाने बरोबर करोनालाही आणले. या शिक्षकावर उपचार सुरू असून त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकाच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

या शिक्षकाने खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्त्राव चाचणी खाजगी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, स्त्राव चाचणी नमुना घेताना योग्य ते निर्देश पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची पुन्हा स्त्राव चाचणी करण्यात येणार आहे.

मुबंईहून संबंधित शिक्षक( वय 56) व त्यांचा मुलगा आपल्या मूळगावी लिंगदेव येथे आले होते. दिनांक 13 मे रोजी मुंबईहून लिंगदेव येथे आल्यावर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. काल त्यांची कवारंटाईनची मुदत संपल्याने स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात या शिक्षक रुग्णाचा अहवाल काल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे.

अकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. हा तपासणी अहवाल खासगी प्रयोगशाळेचा असल्याचे समजते. आता सरकारी प्रयोगशाळेत त्यांचा स्वॅब पाठविण्यात येणार आहे. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी त्या शिक्षक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, तहसीलदार व आरोग्य विभागाची टीम लिंगदेवमध्ये दाखल झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या