निमगाव कोर्‍हाळे येथील भाजी विक्रेती महिला झाली करोनामुक्त तर तिचा मुलगा करोनाबाधित

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील निमगाव येथील भाजीविक्रेती महिला गुरुवारी करोनामुक्त होताच दुसरीकडे तिचा 29 वर्षिय दुसरा मुलाचा अहवाल करोना पाँझिटीव्ह आल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान साईआश्रम फेज 2 मध्ये सदरील तरुणांसोबत विलगीकरण कक्षात असलेल्या इतरांना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले असून खबरदारीच्या विविध उपाययोजना आखण्यात आल्या असून निमगाव येथे कंटेनमेंट तसेच बफर झोन घोषीत करण्यात आले आहे.

राहाता तालुक्यातील शिर्डी नजीकच्या निमगावातील भाजीविक्रेती महिलेला करोनाचा संसर्ग झाला होता त्यानंतर तिच्या कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले. खबरदारी म्हणून प्रशासनाने तिच्या संपर्कातील घरच्या तसेच अन्य लोकांना दि.27 मे रोजी निमगाव येथील साईबाबा संस्थानच्या साईआश्रम फेज 2 मध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यावेळी तिच्या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्यास अचानकपणे त्रास जाणवू लागल्याने त्याचे स्राव तपासणीसाठी नगर येथे पाठवले असता सदरचा अहवाल पाँझिटीव्ह आला असल्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी सांगितले.

काल गुरुवारी सदरील भाजीविक्रेती महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले असून होम क्वारंटाईन ठेवण्यात आले असतांना दुसरीकडे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या तिच्या दुसर्‍या मुलाचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा निमगावात खळबळ उडाली आहे. एकिकडे आई करोनामुक्त झाली तर दुसरीकडे मुलगा करोनाबाधित यामुळे सध्या या भाजीविक्रेती महिलेच्या कुटुंबातील एकूण सहा जण करोनाबाधित आहे.

दरम्यान सदरील 29 वर्षिय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह येताच आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचे पथक विलगीकरण कक्षात पोहचले. यावेळी तरुणाबरोबर असलेल्या अन्य लोकांना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे. या वृत्तामुळे पुन्हा एकदा परिसरात भितीचे वातावरण तयार झाले असून नागरीकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *