Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निळवंडेवर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण टाका व मुदतीत कामे न करणारा ठेकेदार बदला

Share
मुळा, भंडारदरा व निळवंडे कालवा सल्लागार समितीची सोमवारी बैठक, Latest News Mula Bhadardara Nilwand Meeting Ahmednagar

मंगळवारी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

कोपरगाव (प्रतिनिधी)- उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरण प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण अग्रक्रमाने टाकावे व अकोलेतील कालव्यांचे काम शिघ्रगतीने सुरू करण्यासाठी मुदत संपलेली कामे काढून ठेकेदार बदलविण्यात यावा या मागण्यांसाठी निळवंडे कालवा कृती समिती संगमनेर प्रांत कार्यालयासमोर मंगळवार 14 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती समितीचे उत्तमराव जोंधळे यांनी दिली.

जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, सिन्नर आदी सात तालुक्यांतील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्प मंजूर होऊन 48 वर्षे उलटत आली आहेत. मात्र अद्याप या तुषार्त गावांना पिण्याचे व शेती सिंचनाचे पाणी मिळाले नाही. अकोलेतील काम न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात सुरू केले. आता कालव्यांचे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे पाणी लाभक्षेत्राच्या बाहेर दिल्यास 15 टक्क्यांपैकी 12.85 टक्के पाणी ही शहरे वापरणार आहेत.

182 दुष्काळी गावांच्या बारा लाख लोकसंख्येला केवळ दोन टक्के पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे 13 हजार 082 एकर क्षेत्र बाधित होणार असून एवढ्या सिंचन क्षेत्राला पाणीच मिळणार नाही, असा अहवाल जलसंपदाचे नाशिक येथील मुख्य अभियंता यांनी औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना कळविला आहे. मात्र ते कोणाचे कमी करणार याबाबत जलसंपदा विभाग मौन पाळत आहेत.

याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने वारंवार पत्रव्यवहार करून व 182 ग्रामपंचायतींचे ग्रामसभांचे ठराव देऊन पावणेतीन वर्ष उलटूनही येथील नेत्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संगमनेर विभागावर राजकीय दबाव टाकून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव जागचा हलू दिलेला नाही.
या प्रकल्पाचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी या दुष्काळी गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी अग्रहक्काने या धरणावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण टाकावे. व अकोलेतील न्यू एशियन कन्ट्रक्शन कंपनीस बेकायदा दिलेले ठेके काढून घ्यावे. त्यांच्या मुदती संपल्या त्यांना कुठल्याही स्थितीत मुदतवाढ न देता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून जलद काम करणार्‍या नवीन कंपनीस हे काम द्यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.

या आंदोलनास दुष्काळी शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, मार्गदर्शक नानासाहेब जवरे, सोन्याबापू उर्‍हे, सचिव कैलास गव्हाणे, गंगाधर रहाणे, रमेश दिघे, नानासाहेब गाढवे, कौसर सय्यद, दत्तात्रय चौधरी, शिवनाथ आहेर, दत्तात्रय आहेर, आप्पासाहेब कोल्हे, रावसाहेब मासाळ, अ‍ॅड. योगेश खालकर, अशोक गांडूळे, विठ्ठलराव पोकळे, विठ्ठलराव देशमुख, दत्तात्रय शिंदे, श्री. ढमाले, सोमनाथ दरंदले, राजेंद्र निर्मळ, सचिन मोमले, संदेश देशमुख, अशोक गाढे आदींनी केले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!