Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निळवंडे पाटपाणी कृती समितीचे 26 जानेवारीपासून तांभेरेत उपोषण

Share
निळवंडे पाटपाणी कृती समितीचे 26 जानेवारीपासून तांभेरेत उपोषण, Latest News Nilwande Patpani Tambhere Uposhan Rahuri

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील विविध मागण्यांसाठी दि.26 जानेवारीपासून तांभेरे (ता.राहुरी) येथील श्रीराम मंदिरासमोर निळवंडे लाभधारक शेतकरी बांधवांसोबत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती निळवंडे पाटपाणी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी दिली.

निळवंडे लाभधारक शेतकरी बांधवांनी केलेल्या मागणीत, प्रवरा (निळवंडे 2)धरणाचे निळवंडे धरण उद्भव धरून शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले शिर्डी-कोपरगाव पाईपलाईन संदर्भातील दि.26/11/2018.चे परिपत्रक रद्द करावे, अकोले तालुक्यातील डावा कालवा 0 ते 28 किमी. व उजवा कालवा 0 ते 18 किमीची कामे जलदगतीने पूर्ण करावे, उजवा कालवा 85 ते 97 किमीचे तातडीने निविदा काढून कामे सुरू करावी, दि.13/3/2015 रोजी जा.क्र.ला क्षे. वि. प्रा./कार्या.1/1376/2015 अहमदनगर कार्यालयाकडून लेखी आश्वासन देऊन निळवंडे लाभधारक शेतकरी यांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे, निळवंडे कालव्यांची कामे जलदगतीने होण्यासाठी जुन्या ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करून नवीन ठेकेदारांची नेमणूक करावी, या मुद्यांचा समावेश आहे.

दि.26 जानेवारी रोजी तांभेरे येथे श्रीराम मंदिरासमोर सकाळी 8 वा.पासून निळवंडे लाभधारक शेतकर्‍यांसह निळवंडे कृती समिती उपोषणाला बसणार आहे. निळवंडे धरणातून प्रस्तावित शिर्डी-कोपरगाव पाईपलाईनच्या विरोधात निळवंडे पाटपाणी कृती समिती, अहमदनगर- नाशिकच्या वतीने दि.19 मार्च 2018 रोजी शेतकर्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर कुठलीही शासकीय परवानगी नसताना शिर्डी संस्थांनकडून पाईपलाईनच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्याविरोधात देखील निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने एकाच दिवशी दि.10 एप्रिल 2018 रोजी पिंपरी निर्मळ, ता.राहाता, लोणी, ता.राहाता, गुहा, ता.राहुरी, रांजणगाव देशमुख ता.कोपरगाव, तळेगाव दिघे ता.संगमनेर अशा विविध ठिकाणी आंदोलन करून तिव्र विरोध दर्शविला होता.

असे असतानाही शासनाकडून दि.26/11/2018 रोजी परिपत्रक काढून निळवंडे धरणावर शिर्डी-कोपरगावसाठी आरक्षण टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर लाभक्षेत्रातील 182 गावांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. शिर्डी व कोपरगाव शहराकरीता पिण्याचे पाणी आरक्षण दारणा धरणावर असताना व आरक्षण इतके देखील पाणी दोनही शहरे उचलत नाहीत. शहरांच्या आजूबाजूला असणारी कारखानदारी व त्या माध्यमातून होणारी मद्यनिर्मिती यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा गैरवापर होत आहे. याउलट निळवंडे प्रकल्पाची निर्मिती ही आवर्षणग्रस्त भागासाठी करण्यात आली आहे.

या विषयावर निळवंडे पाटपाणी कृती समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी समितीचे मार्गदर्शक गोपीनाथ घोरपडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, उपाध्यक्ष दादासाहेब पवार, राहुरी तालुका मार्गदर्शक चंदन मुसमाङे, तालुकाध्यक्ष डॉ. रवींद्र गागरे, उपाध्यक्ष किरण गव्हाणे, संजय महाराज शेटे, सचिव नंदकिशोर मुसमाडे, संघटक अनिल हारदे, बाळासाहेब हारदे, सर्जेराव घाडगे, सोमनाथ नालकर, सुयोग नालकर, अनिल घाडगे, महेश शिंदे, विष्णू सिनारे, दादासाहेब नालकर, किशोर कोबरणे, बापू कोबरणे, जयसिंग घाडगे, किशोर गागरे, कैलास बेलकर, ज्ञानेश्वर बेलकर, सखाराम गागरे, विनोद महाराज मुसमाङे, रामचंद्र हारदे, दिनकर लोंढे, चांगदेव हारदे उपस्थित होते. उपोषणकाळात लाभधारक गावे एक-एक दिवस बंद पाळणार आहेत. तसेच लाभधारक गावांनी एक-एक दिवस उपोषणस्थळी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर पिण्यासाठी व सिंचनासाठी हे पाणी वापरण्याचे सिंचन नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 25 हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली भिजविण्यात येणार आहे. त्यामुळे या धरणातून इतर शहरांसाठी पाणी दिले गेल्यास मूळ उद्दिष्ट सफल होणार नाही व वर्षानुवर्ष ज्या शेतकर्‍यांनी पाण्याचीे चातकाप्रमाणे वाट बघितली त्यांचे पाणी पळविण्याचे षडयंत्र आखण्यात येत आहे. त्याला निळवंडे लाभधारक शेतकरी व निळवंडे पाटपाणी कृती समिती अहमदनगर-नाशिकचा तिव्र विरोध आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!