Saturday, April 27, 2024
Homeनगरनिजामुद्दीनवरून परतल्यानंतर गायब झालेले ‘ते’ 11 जण सापडले

निजामुद्दीनवरून परतल्यानंतर गायब झालेले ‘ते’ 11 जण सापडले

जिल्हा रुग्णालयात 27 परदेशींसह 147 जणांवर संशय : आरोग्य कर्मचारी धास्तावले

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीदिल्ली येथील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होवून नगर जिल्ह्यात आलेल्यांपैकी चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात असे 46 परदेशी आणि तबलिगी व्यक्ती दाखल झाले होते. यातील 35 व्यक्तींना बुधवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांनी शोधले होते. मात्र, 11 व्यक्ती पसार होते. हे सर्वजण सापडले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

- Advertisement -

दिल्ली येथील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात 46 जण दाखल झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हाभर शोध मोहिम राबवित एका धर्माच्या समाज मंदीरातून या व्यक्तींचा शोध मोहिम घेतली. यासाठी खास हेरही सोडण्यात आले. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात प्रशासनाला 46 पैकी 35 व्यक्तींना शोधण्यात यश आले. मात्र, 11 जण सापडत नव्हते. मात्र, अखेर प्रशासनाच्या शोध मोहिमेला गुरूवारी सकाळपर्यंत यश आले आणि त्या 11 जणांनाही बुधवारी रात्री उशीरा आणि गुरूवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालया क्वारंटाईनमध्ये आता संशयीत व्यक्तींची गर्दी होण्यास सुरूवात झाल्याचे आरोग्य कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे या ठिकाणी कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना जास्ती जास्त आरोग्य सुविधा, मास्क आणि अन्य संरक्षक साहित्य देण्याची मागणी करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील क्वारंटाईनमध्ये 27 परदेशी नागरिकांसह 147 व्यक्तींचे वास्तव्य असल्याने कर्मचारी दहशती खाली आहेत.

राज्य राखीव दल तैनात
मुकुंदनगरमध्ये 13 फिक्स पाईंट लावण्यात आले असून जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्या आल्या आहेत. त्यातील तीन तुकड्या नगरमध्ये राहणार आहेत. त्या मुकुुंदनगर, रामचंद्र खुंट, तेली खुंट, पंचपीर चावडी, चितळे रोड, केडगाव, माळीवाडा, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, बालिकाश्रम रस्ता परिसरात बंदोबस्त देणार आहेत.

आम्हालाही कुटूंब आहेत : आरोग्य कर्मचारी
जिल्हा रुग्णालयातील क्वारंटाईन वार्डमध्ये नेमणुकीस असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांनी आम्ही देखील माणूस असून आम्हाला कुटूंब आहे. या ठिकाणी काम संपल्यावर घरी जावे की नाही, अशी परिस्थिती असून जिल्हा रुग्णालयाने या क्वारंटाईन विभागात काम करणार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या