Thursday, May 2, 2024
Homeनगरनिजामुद्दीन : जिल्ह्यात आलेले 34 जण हुडकले

निजामुद्दीन : जिल्ह्यात आलेले 34 जण हुडकले

12 जणांचा शोध सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवी दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्यापैंकी भाविक अर्थात धर्मप्रसारक राज्याच्या कानाकोपर्‍यात दाखल झाले आहेत. त्यातील 46 व्यक्ती नगरमध्ये आल्याचा गोपनीय अहवाल प्रशासनाला मिळाला होता. त्यातील जामखेड, नेवासा, संगमनेर आणि राहुरी येथे 34 जण सापडले असून उर्वरित 12 भाविकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापैकी 14 व्यक्तींची तपासणी केली असून यातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून त्यांच्या संपर्कातील जामखेडच्या तिघांना संसर्ग झाला आहे. दुसरीकडे भाविकांच्या संपर्कात आलेल्या नगरमधील व्यक्तींचे स्त्राव प्रशासनाने तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे. 46 पैकी 12 व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्ह्यात 34 व्यक्तींचे असल्याचे निष्पन्न झाले असून यापैकी 29 जण परदेशी नागरिक आहेत. यातील 14 जणांची स्त्राव चाचणी अहवाल आले आहेत. उर्वरितांची अहवाल अद्याप आलेला नाही.

दरम्यान, जिल्ह्यातून आतापर्यंत एकूण 437 जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यातील 308 जणांचे स्त्राव निगेटीव्ह तर 8 जणांचे स्त्राव पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 112 जणांचे स्त्राव तपासणी अहवाल येणे बाकी आहेत. या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले जात आहे. दिल्ली येथील कार्यक्रमाला हजेरी लावणार्‍यापैकी जामखेडमधून 14 आणि नेवाशामधून 10 आणि संगमनेर आणि राहुरी येथील 5 अशा 29 व्यक्तींना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची व्यवस्था, अजून तपासणीसाठी व्यक्तीची संख्या वाढली तर करावयाची उपाययोजना आदींबाबत त्यांची चर्चा केली. तसेच, याठिकाणी पाहणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. बापूसाहेब गाढे, डॉ. घुगे आदींची उपस्थिती होती.

117 अहवालाची प्रतिक्षा
112 जणांचे स्त्राव नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी असून आज दुपारपर्यंत आणखी 07 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.

या देशातील आहेत परदेशी
सध्या जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या परदेशी व्यक्ती या इंडोनेशिया, घाना, फ्रान्स, टांझानिया, आयव्हरी कोस्ट, जिबुटी, बुरुंडी, दक्षिण आफ्रिका या देशातील असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक नागरिकांची माहिती घेऊन त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत आहे. सध्या ज्या व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्यांना रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या व्यवस्थेची पाहणीही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केली.

तालुक्याच्या ठिकाणी क्वारंटाईन
तपासणीसाठी येणार्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यासाठीची व्यवस्था आणखी कोठे करता येईल, याची पाहणी त्यांनी केली. ज्या तालुक्यातील व्यक्ती असतील त्यांना तपासणी अहवाल येईपर्यंत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी क्वारंटाईन करता येईल का, अशी व्यवस्था तिथे आहे का, याबाबतही माहिती त्यांनी घेतली.

श्रीरामपुरातील मस्जिदीतून 23 जण ताब्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील उमर फारूख मस्जिदमधून पोलिसांनी 23 नागरिकांना ताब्यात घेतले. या सर्व नागरिकांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले आहे.

शहरातील उमर फारुक मज्जितमध्ये थांबलेले हे नागरिक राज्यातील तसेच देशातून अमरावती17, पुणे 6, येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन महिन्यांपूर्वी पारनेर येथे आयोजित केलेला इस्तेमा रद्द झाल्याने ते याठिकाणी आले होते. तीन महिन्यांपासून येथील उमर फारुख मस्जिदीत ते जमातीसाठी थांबले होते. परंतु त्यानंतर कोरोनाच्या पार्श्चभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्याने 23 जण येथेच अडकले. ते सर्व जण मस्जिदीत असल्याची माहिती तबलीक जमातीचे सचिव अब्दुल रेहमान मोहम्मद शेख यांनी लपविल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी रमीजराजा रफिक आत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अब्दुल रेहमान मोहम्मद शेख यांच्याविरुध्द संचारबंदीच्या काळात मस्जिद उघडी ठेवून जमातीचे प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेरुन आलेल्या 23 जणांना लपवून ठेवल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्याचत दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने सदर 23 नागरिकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना मस्जिदीत होम क्वारंन्टाईन केले आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी पुढील तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या