Thursday, April 25, 2024
Homeनगरऐन यात्राकाळात नेवासा शहरातील रस्त्यांची लागली वाट

ऐन यात्राकाळात नेवासा शहरातील रस्त्यांची लागली वाट

नेवासा (शहर प्रतिनिधी)- ग्रामदैवत श्रीमोहिनीराज यात्रा काळात भूमिगत गटारीचे काम सुरू केले. ते काम करत असताना नगरपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंदिर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून भाविकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामदैवत श्रीमोहिनीराज यात्रेस 1 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून 15 फेब्रुवारीपर्यंत यात्रोत्सव आहे. जिल्ह्यासह राज्यातून भाविक या यात्रेस उपस्थिती लावतात.

मागील काही दिवसांपासून शहरातील डॉ. हेडगेवार चौक ते मोहिनीराज चौक तसेच अर्चना हॉटेल ते महाराष्ट्र बँक रस्त्यावरील भूमिगत गटारींचे कामे सुरू होती. भूमिगत गटारींचे कामे तर झाली परंतु या रस्त्यांची पूर्ण वाट लागली असून रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी माती, दगड पसरलेले आहेत.

- Advertisement -

भूमिगत गटारीसाठी उकरण्यात आलेल्या रस्त्यांची दगड माती काही ठिकाणी उचलण्यात आली तर काही ठिकाणी तेथेच असल्यामुळे बाहेरून येणार्‍या भाविकांची वाहने मंदिर परिसरात जाऊ शकत नाही तसेच मंदिराकडे जाणार्‍या भाविकांना पायी चालताना मोठी कसरत करावी लागते. सध्या मंदिर प्रांगणात भागवत कथा सुरू असल्याने महिला वर्ग व आबालवृद्ध कथा श्रवण करण्यासाठी खड्ड्यातून वाट शोधत जावे लागत आहे.गेल्या चार दिवसांत अनेकजण पाय घसरून या रस्त्यावर पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

व्यावसायिक व नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांना या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतरही यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. मोठाले दगड रस्त्याच्या कडेला तसेच पडले आहेत. नगरपंचायत अधिकार्‍यांनी याची दखल घेतली पाहिजे.

नगरसेवक वर्ग मात्र या विषयावर बोलण्यास तयार नसल्याने हा प्रश्न कोण आणि केव्हा मार्गी लागणार? असा प्रश्न असताना पुढील चार दिवसांनंतर यात्रोत्सव काळात याच रस्त्यावर खेळणी, विविध वस्तू, तसेच यात्रेतील व्यापार्‍यांची दुकाने लागणार आहेत.

या कामाकडे प्रशासन व पदाधिकार्‍यांनी त्वरित लक्ष घालावे व ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीचे आदेश देऊन येत्या दोन दिवसांत परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी यात्रा कमिटीचे अमृत फिरोदिया यांनी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या