Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची बिनविरोध निवड

Share
नेवासा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची बिनविरोध निवड, Latest News Newasa Panchayat Samiti Kagone Jojar Selected Newasa

गडाख गटाचे निर्विवाद वर्चस्व : रावसाहेब कांगुणे सभापती तर किशोर जोजार उपसभापती

नेवासा (तालुका वार्ताहर) – नेवासा पंचायत समितीच्या सभापतिपदी मुकिंदपूर गणाचे सदस्य रावसाहेब सोन्याबापू कांगुणे यांची तर उपसभापतिपदी भानसहिवरा गणाचे सदस्य किशोर आसाराम जोजार यांची बिनविरोध निवड झाली.

नेवासा पंचायत समितीमध्ये जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली 14 पैकी 12 सदस्य निवडून आलेले असल्याने पंचायत समितीवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.

काल मंगळवारी सभापती व उपसभापती पदासाठी निवड होण्याअगोदर सर्व 12ही सदस्यांची ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाजार समितीचे सदस्य कडूबाळ कर्डिले, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, मावळत्या सभापती कल्पना पंडित, उपसभापती राजनंदिनी मंडलिक यांच्या समवेत बैठक झाली.

नेवासा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने सभापतिपदी मक्तापूर येथील कृषी पदवीधर असलेले पंचायत समितीचे सदस्य रावसाहेब कांगुणे यांची तर उपसभापती पदासाठी भानसहिवरा येथील किशोर जोजार यांच्या नावाची सूचना अनुक्रमे सभापती कल्पना पंडित व उपसभापती राजनंदिनी मंडलिक यांनी मांडली. त्यास सर्वांनी संमती दिली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या दोघांची सभापती व उपसभापती म्हणून निवड जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी काम पाहिले.

निवडीची घोषणा झाल्यानंतर सभापती रावसाहेब कांगुणे व उपसभापती किशोर जोजार यांचा ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर भाऊसाहेब वाघ यांनी सत्कार केला.

नेवासा पंचायत समितीच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक ना. शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. सुनीताताई गडाख यांनी वेळोवेळी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनेनुसार आम्ही काम करत राहू. ना. शंकरराव गडाख यांचे राज्यात नाव निघेल असे आदर्शवत काम आम्ही करू. नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब गरजू लाभार्थी केंद्रबिंदू मानून सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही सभापती रावसाहेब कांगुणे व उपसभापती किशोर जोजार यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.

नूतन सभापती-उपसभापती यांचे ना. शंकरराव गडाख, सौ. सुनीताताई गडाख, प्रशांत गडाख, प्रवीण गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, सौ. जयश्रीताई गडाख, सौ. गौरीताई गडाख यांच्यासह नेवासा पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!