Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवाशात यंत्रावर मावा बनवणारे तिघे मुद्देमालासह ताब्यात

नेवाशात यंत्रावर मावा बनवणारे तिघे मुद्देमालासह ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई; आपआपल्या घरी यंत्राद्वारे करत होते उद्योग

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा शहरातील जुन्या कोर्ट गल्लीत विनापरवाना बेकायदा मशिनच्या सहाय्याने मावा तयार करणार्‍या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून पावणेतीन लाखाचे मशीन व माव्यासाठी लागणारी सुपारी, तंबाखू आदी साहित्य जप्त करण्यात आले.
नेवासा येथे यंत्रावर मावा बनवला जात असल्याची गोपनीय माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.

- Advertisement -

त्यामुळे पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, पोलीस नाईक रवींद्र कर्डीले, संतोष लोढे, पोलीस नाईक सचिन आडबल, पोलीस नाईक विश्वास बेरड, पोलीस कॉन्स्टेबल राहूल सोळुंके, प्रकाश वाघल, रवींद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल सोनाली. साठे, चालक पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळेकर असे सदर ठिकाणी दोन पंचांसह जाऊन छापा घातला असता तिथे सोहेल जुबेर शेख, जेन्नोदीन बाबा शेख व सुलेमान ईसाक मनियार तिघेही रा. जुनी कोर्ट गल्ली नेवासा हे त्यांच्या घरात इलेक्ट्रीक मशिनवर मावा तयार करताना मिळून आले.

त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून 2 लाख 72 हजार 102 रुपये किमतीचा हिरा तयार मावा, मावा तयार करण्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू, सुपारी व मावा तयार करण्याची लागणारे इलेक्ट्रीक मशिन असा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी नेवासा ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह तसेच श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे-कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस, अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.दरम्यान सदर प्रकरणी नेवासा पोलिसांनी माव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतर कलमे निश्चित करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा पोलिसांकडून देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या