Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्त 100 टक्के प्रतिसाद

नेवासा तालुक्यात जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्त 100 टक्के प्रतिसाद

नेवासा- नेवासा तालुक्यात ‘कोरोना’ला हद्दपार करण्याच्या इराद्याने आयोजित केलेल्या जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्त प्रतिसाद लाभला.  नेवासा शहरासह नेवासाफाटा, सोनई, घोडेगाव, कुकाणा, भेंडा, खरवंडी, वडाळा बहिरोबा, प्रवरासंगम, देवगडफाटा, सलाबतपूर, शिरसगाव, पाचेगाव, बेलपिंपळगाव, भानसहिवरा, माका आदी प्रमुख गावांसह तालुक्यातील सर्व 127 गावांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री आदींच्या आवाहनासह आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यू जनतेने यशस्वी केला. नगर-औरंगाबाद राज्य महामार्गासह नेवासा शेवगाव राज्यमार्ग, कुकाणा-घोडेगाव, घोडेगाव-सोनई-राहुरी यासह अन्य गावांना जोडणारे रस्ते देखील निर्मनुष्य झाले होते.

रुग्णालये, मेडिकल दुकाने, पेट्रोलपंप सुरू असली तरी तेही सर्व निर्मनुष्यच होते. किरकोळ आजारी रुग्णांनी देखील रुग्णालयात जाणे टाळून घरी बसणे पसंत केले. ठिकठिकाणी पोलीस दिसत असले तरी त्यांच्यावरही तसा भार दिसला नाही कारण हा कर्फ्यू जनतेने जनतेसाठी पाळला असल्याने शंभर टक्के शांततेत पार पडला.

- Advertisement -

भेंडा परिसर

भेंडा (वार्ताहर)- साखर कारखाना, बँका, देवस्थाने, शाळा-महाविद्यालये आणि अनेक उद्योग व्यवसाय असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावामध्ये ‘जनता कर्फ्यू’ला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. दवाखाने, औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. लोक घरामध्येच बसून होते. महाराष्ट्रच नव्हे इतर राज्यातून कावीळ उपचारासाठी रुग्ण भेंडा येथील कावीळ उपचार करण्यासाठी येत असतात. परप्रांतियांकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हे कावीळ उपचार केंद्रही बंद ठेवण्यात आले होते. भेंडा परिसरातील रस्त्यांवर 1000 हून अधिक लोकांची कायमच गर्दी असते, परंतु जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रस्त्याावर एकही वाहन व माणूस नसल्याने रस्ते सुनसान झाले होते.

बेलपिंपळगावात शेतकरी व मजूरही घरातच

बेलपिंपळगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे पूर्णपणे बंद पाळण्यात आला. गावातील अत्यावश्यक सेवा देखील बंद करून गावाने या बंदमध्ये सहभाग घेतला. गावात कोणीही सकाळपासून घराबाहेर पडले नाही. शेतकरी देखील काम सोडून घरी असल्याचे स्पष्ट चित्र आज दिसून आले.बेलपिंपळगाव येथे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात भेट दिली असता त्यांना देखील गाव पूर्ण बंद असल्याचे दिसून आले. तसेच पोलीस नाईक बाळासाहेब कोळपे, रवींद्र पवार यांनी देखील सकाळपासून गावात कायदा व सुव्यवस्था नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न केला. गावात आज कोणी देखील शेतात कामाला गेले नाही. या तीन दिवसांपासून गावातील बाजारपेठेमध्ये पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला असून कोणीही घराबाहेर पडले नाही व घरात बसून आदेशाचे पालन करणे पसंद केले. बेलपिंपळगावसह घोगरगाव, जैनपूर, बेलपांढरी या गावांत देखील स्वंयस्फूर्तीने पूर्णपणे बंद पाळण्यात आला.

देवगडफाटा-प्रवरासंगम परिसर

देवगडफाटा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील गंगाथडी परिसरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवगड देेवस्थानचे प्रमुख भास्ककरगिरी महाराज यांनी जनता कर्फ्यूद्वारे जनतेला घरातच राहण्याच्या केलेल्या आवाहनास जनतेने 100 टक्के प्रतिसाद दिला. देवगड फाटा, देवगड, बकुपिपळगाव, प्रवरासंगम, माळेवाडी, टोका, जळके बुद्रुक, जळके खुर्द, खडका, मडकी, पिंपरी, मुरमे, खेडले काजळी, मंगळापूर तसेच नदीकाठच्या परिसरातील इतर गावांनी प्रतिसाद दिला सकाळपासूनच सर्व भागातील रस्ते ओस पडले होते. नगर-औरंगाबाद महामार्गावर सुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी दिसून येत होते. प्रत्येक दुकानाचे शटर, दरवाजे बंद होते. ग्रामीण भाग असूनही सर्वानी प्रतिसाद दिला. चिमुकली, मोठी माणसे सर्व घरातच होते.

पेट्रोलपंपावर ग्राहकांचा अभाव
आम्ही पेट्रोल पंप टाकून आठ वर्षे झाली. परंतु असा बंद ला प्रतिसाद कधी बघितला नाही. प्रथमच आज निच्चांकी इंधन विकले गेले.
-दिनकरराव कदम पेट्रोलपंप मालक प्रवरासंगम

दवाखानेही पडले ओस
आज माझ्या दवाखान्यात प्रथमच खुप कमी रुग्ण होते. एवढा अल्प प्रतिसाद मी कधीच पहिला नव्हता. लोकांनी कोरोनाला हरवण्यासाठी पुढेही देशाला अशीच साथ दिली पाहिजे.
– डॉ. संजय चव्हाण प्रवरासंगम

- Advertisment -

ताज्या बातम्या