Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

145 नव्या संशयितांच्या अहवालाची प्रतिक्षा

Share
Jalgaon

पालकमंत्री मुश्रीफ : कोरोनाशी मुकाबल्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा यंत्रणेने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, कोरोनाची संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे सध्या औषधी साठा असून जास्त संख्येने पीपीई कीट मिळण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणे झाले आहे. दरम्यान, अलमगिर येथील पेशंटच्या संपर्कातील मुकुंदनगर, अलमगिर व सर्जेपुरातील 84 संशयितांचे सोमवारी तर मंगळवारी आणखी 61 असे 145 स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात हे 145 नवे संशयित आढळून आले असून त्याच्या अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री मुश्रीफ यांनी मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, नगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. सार्वजनिक संपर्क टाळावा. सर्व नागरिकांनी हे नियम पाळले, तर ही परिस्थिती बदलेल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 760 व्यक्तींची कोरोने टेस्ट करण्यात आली असून त्यातील 24 पॉझिटिव्ह निघाले आहेत. याशिवाय श्रीरामपूर येथील तरुणही पॉझिटिव्ह निघाला असून तो पुण्यातील ससूनमध्ये उपचार घेत आहे. अलमगिर येथील पेशंटच्या संपर्कातील मुकुंदनगर, अलमगिर व सर्जेपुरातील 84 संशयितांचे सोमवारी तर मंगळवारी आणखी 61 असे 145 स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात हे 145 नवे संशयित आढळून आले असून त्यांचे रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील बाधित
नगर 11 (परदेशी रुग्णांसह), जामखेड 6 (परदेशी रुग्णासह), संगमनेर 4, राहाता 1, नेवासा- 2 आणि श्रीरामपूर 1

नगरचा सर्जेपूरा लॉकडाऊन
शहरातील सर्जेपूरा भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळ्यानंतर मंगळवारी सर्जेपूरातील सर्व रस्ते नागरिकांनी बांबू बांधून पूर्णपणे बंद केले. यामुळे सर्जेपूरा आणि परिसर पूर्णपणे लॉकडाऊन झाला होता. रविवारी या ठिकाणी मंगळवारी बाजार भरत असतो. मात्र, कालच्या मंगळवारी या परिसारात भयान शुकशूकाट होता.

माजी नगरसेवकही क्वारंटाईन
रविवारी अलमगिर येथील एक पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कातील 31 जणांचे स्त्राव घेत ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील तीन पॉझिटिव्ह निघाले. त्यात अलमगिर येथील दोन आणि सर्जेपुरातील एकाचा समावेश आहे. सर्जेपुरात आढळलेला तरुण हा माजी लोकप्रतिनिधीशी (नगरसेवक) संबंधित आहे. त्यामुळे माजी लोकप्रतिनिधीसह त्यांच्या कुटुंबियांतील सगळ्यांचेच स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निवारा केंद्रात दोन हजार नागरिक
कोरोनाचा प्रार्दभाव वाढल्यामुळे राज्य सरकारने जिल्हा बंदी जाहीर केली. त्यामुळे बाहेरील स्थलांतरित, मजूर यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्रशासनाने आणि खासगी आस्थापनांनी सुरु केलेल्या 29 निवारा केंद्रातून 2 हजार नागरिकांची व्यवस्था केली असून तेथे त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी होत असल्याचेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!