Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर – महापालिकेची अत्यावश्यक सेवा थांबविणार : लोखंडे

नगर – महापालिकेची अत्यावश्यक सेवा थांबविणार : लोखंडे

अहमदनगर – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून औषध फवारणी सुरू असताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहाणीचा मनपा कामगार युनियनने निषेध करतानाच आक्रमक भूमिका घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि मनपा कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

बुधवारी रात्री उशिरा नागापूर परिसरात महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ व अविनाश हंस या दोघांना शिवसेना नगरसेविकेच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात संचारबंदी लागू असतानाही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दारू पिऊन फिरताहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे कर्मचारयात भीतीचे वातावरण आहे. शहर अभियंत्यांवर बूटफेक प्रकरणातही हे आरोपी आहेत. पोलिसांकडून अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी युनियन ने केली आहे. गुन्ह्यामध्ये कलम 144 चे उल्लंघन करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आदी गुन्हे वाढवावेत. मनपा आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी व जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करावी. कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत अत्यावश्यक सेवा बंदच राहतील, असा निर्णय युनियन घेतला असल्याचे अनंत लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, दोन्ही कर्मचारी खासगी रूग्णालयात उपचार घेत असून त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. मनपा आयुक्त, उपायुक्त व सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. संचारबंदीच्या काळात नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी मनपाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. अशा काळात सर्वांनी महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक होते. मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष यांनी अत्यावश्यक सेवा बंद करण्याबाबत सूचना दिलेली आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत असा निर्णय योग्य नाही. यासंदर्भात कर्मचारी व युनियनच्या पदाधिकार्‍यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त श्रीकांत मयकालवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या