महाराष्ट्रातून भाजप सरकार गेलं तसा कोरोनाही जाईल !

महाराष्ट्रातून भाजप सरकार गेलं तसा कोरोनाही जाईल !
राष्ट्रवादी-भाजप समर्थकात सोशल नोकझोक
अहमदनगर – कोरोनाशी लढा देताना करायच्या मदतीवरून राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते यांच्यातील नोकझोक वाढली आहे. रविवारी सकाळी वादाला सुरुवात झाली. मदत काळात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते कुठे आहेत, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर म्हणून प्रदेश युवक राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात ‘उघडा डोळे, बघा नीट’ अशी मोहीम सुरू केली. याच मोहिमेची माहिती ट्विटवरून देत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ‘सामाजिक काम केल्याच दाखविण्याची गरज नसते पण काही लोकांना दाखविल्याशिवाय दिसत नाही’ असा टोला पाटील यांना लगावला.
त्यांच्या या ट्विटनंतर भाजप आणि राष्ट्रवादी समर्थकात जुंपली. एकीकडे राष्ट्रवादी समर्थकांनी भाजपवर मदत, पीएम केअर फंड, विरोधी पक्षनेता यावरून निशाण साधला. एकाने तर ‘महाराष्ट्रातून भाजप सरकार गेलं तसाच कोरोनाही जाईल’ असा टोला हाणला. तर भाजप समर्थकांनी राष्ट्रवादीला वाधवाण प्रकरणावरून चिमटे काढले. एकाने ‘गरीबाच्या झोपडीत जन्म घेऊन निवडणूक लढण्यास मजा येते ती श्रीमंतांच्या वाड्यात घेऊन कधीच येत नाही’ असा थेट आ.पवारांना टोला लगावला.
दरम्यान राज्यासह नगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या तथाकथित मदतकार्याला सध्या भरती आली आहे. तसेच कोरोनासारख्या गंभीर संकटातही काही राजकीय नेते आपली सवय सोडत नसल्याची प्रचिती सामान्य जनतेला येत आहे.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com