Type to search

Featured नाशिक

नवरात्र २०१९: नाशिकमधील अतिप्राचीन कामाक्षी देवी मंदिर

Share

नाशिक | प्राजक्ता नागपुरे

नवरात्र म्हणजे देवीरूपी शक्तीची उपासना. या काळात देवी महाशक्तीचे रूप धारण करून प्रबळ झालेल्या अपप्रवृतींचा विनाश करते, असे मानले जाते. यामुळे नवरात्रात देवीच्या सर्व रुपांची आराधना करतात. त्यातून निर्माण झालेल्या स्थान माहात्म्यातून ठिकठिकाणच्या देवीमंदिरांना महत्त्व आलं आहे. नाशिकमधील कालिका माता, सप्तश्रृंगी देवी, सांडव्यावरील देवी यांसोबत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीस्थित कावनई क्षेत्र येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. भारतातील चार शक्तिपीठांपैकी एक असणारे श्री क्षेत्र कावनई हे कांचीपूरा, गुवाहाटी, करंजगाव यानंतर येणारे महत्त्वाचे शक्तिपीठ समजले जाते.

भाविकांकडून कामाक्षी देवीच्‍या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्‍यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे.

तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. असा कावनई क्षेत्राचा इतिहास आहे.

कावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्‍यात आल्‍याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.

कावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.

‘श्री क्षेत्र कावनाई’ला नाशिक शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक महामार्गावरून घोटी-इगतपुरीच्‍या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ उजव्‍या हाताला फाटा फुटतो. तो कावनाई फाटा या नावाने ओळखला जातो. कावनाई गाव तेथून सात किलाेमीटर अंतरावर आहे. इगतपुरीहून कावनाई गावापर्यंतचे अंतर सतरा किलोमीटर आहे. गावात शिरल्‍यानंतर उजव्‍या हाताला कावनाई गड दिसतो. गडाची एक सोंड गावात उतरली आहे. गडावर राहण्‍याची सोय नाही. मात्र पायथ्‍याला ‘कपिलाधारातिर्थ’ या आश्रमात राहण्‍याची सोय होऊ शकते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!