Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकला‘शिवाई’चे चार्जिंग स्टेशन; बॅटरी चार्जिंगनंतर 300 कि. मी.चा पल्ला गाठणार

Share

नाशिक । भारत पगारे

राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या बहुचर्चित ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसच्या मार्गांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बोरिवली या विभागांद्वारे ही सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी पाचही ठिकाणी सध्या ‘इ-बस चार्जिंग’ स्टेशन उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असून नाशिक येथे डेपो -1 मध्ये हे चार्जिंग स्टेशन असणार आहे.

बॅटरी चार्जिंग केल्यानंतर ही बस किमान 300 कि.मी.चा पल्ला गाठू शकते. त्यानुसार एसटीने प्राथमिक मार्ग निश्चित केले आहेत. प्रामुख्याने नाशिकसह पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर व बोरिवली या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे. बसची सुरुवात आणि बसचे ठिकाण, अशा दोन ठिकाणी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरच ‘शिवाई’ प्रत्यक्ष मार्गावर धावू शकेल. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एसटी देखील इ-वाहनांना प्राधान्य देत आहे, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात एसटीने शंभर इ-बस भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरविले आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; तर केंद्र सरकारच्या ‘फेम इंडिया’ योजनेअंतर्गत एसटीला 50 इ-बस मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पहिल्या इ-बसला ‘शिवाई’ असे नाव देत लोकार्पण करण्यात आले. विजेवर चालणार्‍या या पर्यावरणपूरक बसमुळे एसटी महामंडळाच्या खर्चात बचत होणार आहे.

इंधन दरवाढीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी विजेवर चालणारी बस घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. या बसची आसन क्षमता 44 इतकी असून ही बस वातानुकुलीत आहे. चार्ज केल्यानंतर 300 किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची क्षमता आहे. शिवाय बस चार्ज होण्यासाठी 1 ते 5 तासांचा कालावधी लागणार आहे. या बसचा खर्च शिवशाही बसपेक्षा अधिक आणि शिवनेरीपेक्षा कमी असणार असून या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदुषणात घट होणार आहे. बसची बांधणी जयपूरमध्ये करण्यात आली असून तिची किंमत 2 कोटी रुपये आहे. बस मार्गस्थ करण्यासाठीच्या सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या असून साधारणपणे 3 ते 5 तासांमध्ये बसची चार्जिंग पूर्ण होते. जलद चार्जिंग यंत्रणेने एका तासात देखील बस चार्जिंग पूर्ण होण्याचा दावा महामंडळाने केला आहे. ही इ-बस 1 किलोवॅटमध्ये 1 ते 1.25 किलोमीटर धावण्याची अपेक्षा असून तिची देखभाल-दुरुस्ती खासगी कंपनी करणार आहे.

‘सीआयआरटी’ चा हिरवाकंदील

इ-बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई ते पुणेदरम्यान इ-बसची चाचणीही घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) कडूनही या सेवेला हिरवा कंदील देण्यात आला आहे.

इ-बसचे संभाव्य मार्ग

*नाशिक-बोरिवली-नाशिक
*पुणे-नाशिक-पुणे
*पुणे-औरंगाबाद-पुणे
*पुणे-कोल्हापूर-पुणे
*पुणे-बोरिवली-पुणे

‘शिवाई’चे वैशिष्ट्ये

सीसीटीव्ही
व्हिटीएस
आरामदायी आसने
प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी उद्घोषणा यंत्र

लोकेशन फायनल झाले असून नाशिकच्या डेपो एकमध्ये शिवाईचे चार्जिंग स्टेशन असणार आहे. सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे.

-नितीन मैंद, विभाग नियंत्रक, रापम, नाशिक.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!