Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकरंगोत्सवासाठी तरूणाई सज्ज; रंगाने सजली बाजारपेठ

रंगोत्सवासाठी तरूणाई सज्ज; रंगाने सजली बाजारपेठ

नाशिक । रंगपंचमीत धमाल करण्यासाठी तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून, ‘करोना’चे सावट या सणावर असले, तरी पुरेशी खबरदारी घेत ‘शॉवर डान्स’साठी सज्जता करण्यात आली आहे. डीजेच्या तालावर बेधुंद रंग खेळणारी तरुणाई शुक्रवारी साजर्‍या होणार्‍या रंगोत्सवासाठी सज्ज झाली असून करोना व्हायरसचे सावट असले, तरीही आम्ही रंग खेळणार असल्याचे तरुणाईने म्हटले आहे.

नेहमीप्रमाणे पंचवटी, सोमवार पेठ, साक्षी गणेश मंदिर चौक, गाडगे महाराज पुतळा चौक, गोदाघाट, भद्रकाली परिसरासह इतर ठिकाणी शॉवर्स बसविण्यात येणार आहेत. शुक्रवारी (दि. 13) दुपारी 12 वाजेपासूनच शॉवर्स सुरू होणार असून, नैसर्गिक रंग खेळण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. करोना व्हायरसमुळे यंदा शॉवर्सच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता कमी असली, तरी नेहमीप्रमाणेच उत्साह असणार आहे. केशरी रंग खेळण्यावर भर देण्यात येणार आहे. दर वर्षीप्रमाणे साऊंड सिस्टीम लावण्यात येणार आहे. सार्वजनिक रंगोत्सवाचे कार्यक्रम रद्द झाल्यामुळे गल्लीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन तसे नियोजन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी एक दिवस आधीच शाळांमध्ये रंगोत्सव साजरा केला.

- Advertisement -

ईको-प्रेंडली रंगांवर भर
रंगपंचमीला बेधुंद होऊन रंगांची मुक्त उधळण करण्यात येते. परंतु यावर्षी कारोनाच्या धास्तीने चायनीज रंग मागविण्यात आले नाहीत. त्यामुळे यावषी ईको-फ्रेंडली रंग खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. याचबरोबर रंग, पिचकारी, मुखवटे यांची खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणच्या दुकानांवर गर्दी दिसत आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द
सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दरवषी शहरात विविध ठिकाणी सामुदायिक रंगपंचमीचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी सरकारने केलेल्या आवाहनानुसार आयोजकांनी असे कार्यक्रम रद्द केले आहेत. एकाच ठिकाणी हजारो नागरिक एकत्रित आल्यामुळे कोरोनाचा धोका असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

ओले कपडे विद्युत तारांवर टाकू नका
शहरात ब़र्‍याच ठिकाणी काही तरुणांकडून रंगोत्सवावेळी विद्युत वाहिन्यांवर ओले कपडे टाकण्यात येतात. परंतु यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे काहीवेळा वीजपुरवठा खंडित करावा लागतो. तसेच फिडर पिलर बॉक्सजवळ रंग खेळू नये आणि येथे पाण्याचा वापर कटाक्षाने टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या