सिन्नर : कोरोना जनजागृतीसाठी ग्रामविकास अधिकारी बनले ‘यमराज’

सिन्नर : कोरोना जनजागृतीसाठी ग्रामविकास अधिकारी बनले ‘यमराज’

सिन्नर : शासनस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजना करण्यात येत असल्या तरी नागरिक त्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाहीत. कोरोनाचे संक्रमण वाढल्यास आपणच मृत्यूची कवाडे खुली करण्यास कारणीभूत ठरणार आहोत हे पटवून देण्यासाठी तालुक्यातील मनेगाव-धोंडविर नगरचे ग्रामविकास अधिकारी एम. बी. यादव यांनी चक्क यमराजाच्या भूमिकेत गावात अवतरून अनोख्या पद्धतीने जनजागृती केली.

कोरोनाचा  धोका दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र, शहरी किंवा ग्रामीण भागात देखील कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसून लोक त्यांच्या नित्य दिनक्रमात व्यस्त असल्याचे आढळून येत आहे.

शासनाकडून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. शासकीय सूचनांचे पालन करत नाहीत. या रोगाचा शिरकाव गावात होऊ नये म्हणुन ग्रामपंचात प्रशासन,आरोग्य विभागाच्या वतीने पथनाट्याचा आधार घेत गावातील चौका चौकात प्रबोधन करण्यात आले.

यासाठी ग्रामविकास अधिकारी यादव यांनी यमराज, आरोग्य सेवक प्रभाकर ढापसे यांनी चित्रगुप्त तर ग्रामपंचायतचे लिपिक भाऊसाहेब सोनवणे यांनी यमदूताची भूमिका साकारली. गावातील चौकाचौकात जात या त्रयीने ग्रामस्थांचे प्रबोधन केले.

लॉक डाऊनचा उद्देश, सोशल डिस्टनसिंग याबाबत माहिती देतानाच सरकारी यंत्रणांकडून करोना रोखण्यासाठी होणारे प्रयत्न, नागरिकांच्या जबाबदाऱ्या याबद्दल त्यांनी प्रबोधन केले. गावात साक्षात यमराज, चित्रगुप्त आणि यमदूत अवतरल्याने ग्रामस्थ सुरुवातीला अवाक झाले होते. मात्र त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कोरोना विरोधात पाठबळ देण्याचा निर्धार या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com