वेळीच सीझरच्या निर्णय न घेतल्याने महिलेचा मृत्यू; डॉक्टरांचा हलगर्जीपणा नडला

नाशिक । बाळंतपणात महिला तसेच नवजात शिशुचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

मंगल रविंद्र यादव (28, रा. पिंपळद, ता. नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना सोमवारी (ता.23) रात्री प्रसुतीसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोट दुखत असल्याने मंगल यांनी वारंवार प्रसुती विभागातील डॉक्टर व परिचारिकांना सांगितले. परंतु, नॉर्मल प्रसुतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत संबंधितांच्या गर्भवतीच्या त्रासाकडे दूर्लक्ष केले. बुधवारी (ता.25) सकाळी गर्भवती मंगल यांना जास्त त्रास होऊ लागल्यानंतर स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अजित तिदमे यांनी प्रसुतीसाठी घेतले.

त्यावेळी खूप त्रास होऊ लागल्याने गर्भवतीने, त्रास होत असून नॉर्मल न करता सिझर प्रसुती करा, असे विनवणीही केल्याचे नातलगांनी सांगितले. परंतु तरीही नॉर्मल प्रसुती होईल, असे सांगत दूर्लक्ष केले. यादरम्यान, त्यांना झटके आले आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ आयसीयुमध्ये दाखल करीत व्हेटिंलेटर लावण्यात आले. परंतु सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मंगल यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच, संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करीत सरकारवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले. दरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठून नातलगांची भेट घेत, गर्भवतीचे शवविच्छेदन तीन सदस्यीय समितीच्या उपस्थितीमध्ये करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मृतदेहाच पंचनामा झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *