Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमुंबई नाका : अन अवघ्या तासाभरात मधुमेह रूग्णाला घरपोच औषधे मिळाली; डॉ....

मुंबई नाका : अन अवघ्या तासाभरात मधुमेह रूग्णाला घरपोच औषधे मिळाली; डॉ. पवार ठरले देवदूत

नाशिक : सध्या कोरोनाच्या संकट काळात अनेक हात सरसावत असून माणुसकीचे दर्शन नेहमीच होताना दिसून येत आहे. अशाच एक प्रसंग दिपाली नगर (मुंबई नाका) येथील राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाला प्रत्ययास आला.

झालं असे की, मधुमेह असलेल्या या नागरिकाची औषधे आज सकाळी संपली. घरात ते आणि त्यांची मुलगी दोघेच असल्याने संचारबंदीमुळे बाहेर कसं जायचं, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र त्यांच्या मदतीला नाशिकचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार धावून आले.

- Advertisement -

संबंधित रुग्णाने फोन केल्यानंतर त्यांना अवघ्या तासाभरात मधुमेहाची औषधी घरपोच मिळाली. दारात औषधे घेवून आलेले ‘देवदूत’ पाहताच संबंधित रुग्णाचे हात आपसूकच जोडले गेले.

मुंबई नाका येथील दिपाली नगरात संजय गोसावी,( ४९) हे आपल्या मुलीसोबत राहतात. गोसावी हे मधुमेहाचे रुग्ण असून आज सकाळच्या सुमारास त्यांची औषधे संपली. लॉक डाऊन असल्याने बाहेर पडणे शक्य नव्हते. यावेळी गोसावी यांना एक आशेचा किरण दिसला. नाशिक जिल्हा आपत्ती निवारण कक्ष. श्री. गोसावी यांनी लागलीच आपत्ती निवारण कक्षाला फोन करून आपली अडचण सांगितली. तेथील अधिकाऱ्यांनी लगेच डॉ. अनंत पवार यांचा फोन नंबर त्यांना दिला. गोसावी यांनी डॉ. पवार यांनी आपली अडचण आणि औषधांबाबत माहिती दिली.

डॉ. पवार गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्ण तपासणी आणि इतर संबंधित कामांमध्ये पूर्ण व्यस्त आहेत. मात्र त्यांना श्री. गोसावी यांच्या व्याधीबाबत समजताच त्यांनी लगेचच तपासणी पेपर तयार करून आपल्या यंत्रणेद्वारे अवघ्या तासाभरात श्री. गोसावी यांना घरपोच औषधे पुरविली. फोन केल्यापासून बेचेन असलेल्या गोसावी यांच्या दारात शासकीय वाहन थांबताच त्यांचा जीव भांड्यात पडला.

अवघ्या तासाभरात औषधी उपलब्ध करून दिल्याने नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेविषयी आणि यंत्रणेविषयी ‘सर्वसामान्य नाशिककर’ असलेल्या श्री. गोसावी यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या