Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनिफाड : पत्नी, मुलांसह शेतकऱ्याचा इच्छामरणासाठी मुख्यमंत्र्यांना अर्ज

निफाड : पत्नी, मुलांसह शेतकऱ्याचा इच्छामरणासाठी मुख्यमंत्र्यांना अर्ज

शिरवाडे वाकद : मुखेड महाराष्ट्र बँक शाखेच्या मनमानी कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज या नाराज दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज सादर केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांनी निवेदन दिले.

वाळुंज यांनी म्हटले आहे की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. संबंधित कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचा संदेशही 1 एप्रिल 2018 रोजी प्राप्त झाला. मात्र मुखेड येथील महाराष्ट्र बँकेत चौकशीसाठी गेलो असता बँक व्यवस्थापकाने, तुमच्या कर्जमाफीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचे सांगत तुम्हाला कर्ज भरावेच लागेल असे सुनावले. मी वारंवार बँक शाखेला भेट दिली, मात्र प्रत्येक वेळेस मला बँकेकडून नकारघंटाच ऐकावयास मिळाली.

- Advertisement -

आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. पत्नीची 2016 साली हृदयाची शस्त्रक्रिया झाली. 2017 सालात तिला अर्धांगवायूचा आजार झाला. वेळोवेळी लागणारा औषधोपचाराचा खर्च व मुलीचे लग्न करणे आवश्यक आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च, दुष्काळ व अतिवृष्टी, नापिकीमुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. त्यामुळे आम्ही कर्ज भरु शकत नाही. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सन 2016 पासून जाहीर केलेली आहे.

आमचे कर्ज सन 2010 मधील असल्याने याही कर्जमाफी योजनेत आम्ही बसत नाही. त्यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमच्या पश्चात मुलांची परवड होवू नये म्हणून आम्हाला मुलाबाळांसह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेला हरताळ
शेतकर्‍यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज देण्याची मोहीम हाती घेतली आहे, मात्र मुखेडच्या महाराष्ट्र बँक शाखेने या योजनेला हरताळ फासला आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकर्‍यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज चार टक्के दराने येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून शेती उपकरणे, औजारे, पशुपालक विनातारण 1 लाख 60 हजारांपर्यंत कर्ज, शेतकर्‍यांना क्षेत्रफळानुसार 1 ते 3 लाखापर्यंत कर्ज, 1 लाखाच्याआत उचल असल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या