PhotoGallery : संतांचिया चरणी माथा टेकवाया…. नाशिक झाले वारकरीमय

PhotoGallery : संतांचिया चरणी माथा टेकवाया…. नाशिक झाले वारकरीमय

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मार्गक्रमण करणाऱ्या हजारो दिंड्यांचे नाशकात आगमन होत आहे. हाती टाळ , खांद्यावर भगवी पताका घेतलेले हजारो वारकरी शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहर जणू वारकरीमय झाले आहे. टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाच्या जयघोषाने नाशिक नगरी भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. ठिकठिकाणी नाशिककर या दिंड्यांचे स्वागत करीत पालखीचे दर्शन घेत आहे.

दरम्यान त्रंबकेश्वर येथे येत्या सोमवारी (दि. २०) रोजी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा होणार आहे. त्या निमित्ताने राज्यातून वारकरी शहरात दाखल होत आहे सध्या शहरातील वातावरण विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेले असून, संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेकरिता विविध गावांमधून दिंड्या नाशिकमध्ये दाखल होत आहेत. दिंड्यांचे रथ शहरामध्ये जागोजागी थांबलेले असून, काही दिंड्या त्र्यंबकेश्वराकडे मार्गस्थ होत आहेत. तर काही वारकरी भजनात दंग होत हाती ध्वज घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात मुखी विठ्ठलाचा आणि ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष करीत रामकुंडावर दर्शनासाठी गेल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान शुक्रवारच्या मुक्कामानंतर हजारो दिंड्या त्र्यंबककडे मार्गस्थ होणार आहेत.

षटतिला एकादशीला भरणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेसाठी पंचवटी परिसरातील औरंगाबाद रोड, पेठरोड, दिंडोरी रोड, मुंबई-आग्रा महामार्ग या मुख्य मार्गांनी दिंड्या येतात. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या यात्रेच्या एक दिवसअगोदर या दिंड्या त्र्यंबकेश्वरला पोहचतील, अशा पध्दतीने त्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

दरवर्षीप्रमाणे या दिंड्याचे मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात. चहा, नाश्ता, जेवण यांच्या व्यवस्थेची नियोजनही ठरल्याप्रमाणे केले जात असल्याप्रमाणे या दिंड्या ठराविक ठिकाणावर पोहचत असतात. यंदा पाच लाखाहून अधिक वारकरी येतील, असा अंदाज यात्रा समितीने व्यक्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com