Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची अत्यावश्यक पदे तातडीने भरणार : छगन भुजबळ 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची अत्यावश्यक पदे तातडीने भरणार : छगन भुजबळ 

नाशिक : नाशिकसह मालेगांवमधे आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व वार्ड बॉय तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांची कमतरता आहे. येणाऱ्या काळात मालेगांव व जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा अजुन वाढू शकतो हे लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत कोव्हीड- १९ साठी केली जाणारी पदभरती जलदगतीने करण्यात यावी याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जिल्हयातील कोरोना साथरोग नियंत्रणाचा व एकूणच प्रशासनाच्या कामाचा आढावा पालकमंत्री भुजबळ यांनी घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री भुजबळ बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना श्री.भुजबळ म्हणाले, येणाऱ्या काळात मालेगांवमधील रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी लागणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वार्ड बॉय व अनुषंगिक पॅरामेडिकल स्टॉफ यांची तातडीने गरज भासणार आहे. कोव्हीड- १९ च्या निमित्तोन आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविण्यात आली असुन त्यासाठी नाशिक विभागातुन सुमारे २० हजार अर्ज आरोग्य विभागास प्राप्त झाले आहेत.

सदरची भरती प्रक्रिया अति जलद गतीने राबविल्यास मालेगांवमधे वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव वेळेत नियंत्रणात येऊ शकतो, यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तात्काळ आजच प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्या आहेत. या संदर्भात मी व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आरोग्य मंत्र्यांशी जिल्हयातील मनुष्यबळ व कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत चर्चा केली असल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.

मालेगांवमधे डॉक्टरांची गरज पाहता स्थानिक खाजगी युनानी डॉक्टर्सची मदत घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे. त्याचबरोबर अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांना मालेगांवमधे एकाचवेळी सातशे ते आठशे लोकांवर उपचार करता येईल या क्षमतेचे पेन्डॉल्स उभारण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. कोरोनाशी लढा देतांना जिल्हा प्रशासनाचे काम अत्यंत चांगले आहे.

शिवभोजन थाळीच्या बाबतीत दर्जा व संख्या याबाबत कुठलीही तडजोड शासनामार्फत स्विकारली जाणार नाही. शिवभोजन थाळीला लॉकडाऊनच्या कालावधीत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गोर गरीब गरजु नागरिकांना त्यामुळे चांगली सोय झाली आहे. शिवभोजन थाळीच्या बाबत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्याच्या सूचना आज सर्वांना देण्यात आल्या आहेत व पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदा यांच्यासाठी विमा योजना तयार करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी आज सांगितले.

या पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वासराव नागरे पाटील, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या